– डोंगर यावली, पिंपळखुटा सबस्टेशनचे काम तातडीने सुरू करा !
– दिवसा 12 तास अखंडित वीजपुरवठ्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुक्यातील दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी आणि हिवरखेड, पिंपळखुटा मोठा परिसरातील कृषी वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. डोंगर यावली, पिंपळखुटा मोठा येथील प्रस्तावित सबस्टेशनचे काम तातडीने सुरू करावे, हिवरखेड येथील 33 केव्ही वीज वितरण केंद्राची क्षमता वाढवावी आणि शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली.
वर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांचा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाब आणि कृषी वीज वाहिन्यांवरील बिघाडाचा सामना करावा लागत आहे. संत्रा बागांसह इतर पिकांना वेळेवर पाणी देणे आवश्यक असताना वीजपुरवठ्याच्या अनिश्चिततेमुळे सिंचनाचे नियोजन कोलमडत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे महावितरणने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.
परिसरातील वाढता कृषी वीजभार लक्षात घेता डोंगर यावली, पिंपळखुटा येथील प्रस्तावित वीज उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करून निर्धारित कालावधीत पूर्ण करावे. हिवरखेड येथील 33 केव्ही केंद्राची क्षमता वाढवून कमी दाबाची समस्या दूर करावी, तसेच नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
“शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळणे हा त्यांच्या शेतीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. वारंवार वीज खंडित होत असेल आणि कमी दाबामुळे कृषिपंप चालत नसतील, तर शेतीचे नियोजन कसे करायचे? महावितरणने आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामे सुरू करावीत. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे कार्यकारी अभियंता कासट यांना देण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके, जिल्हा सरचिटणीस हितेश साबळे, उपसरपंच कांचन कुकडे, संजय पांडव, मनीष गुडधे, विजय कडू, आकाश अमदरे, अजय मस्के, नितीन विघे, शेखर विघे, शरीफखा पीरखा, प्रमोद दंडाळे, प्रशांत राऊत, अक्षय धानोरकर, आशिष तडकित, विनोद खटगडे, शिरीष काळे, अरुण राऊत, निलेश कडू, दिलीप मालवीय, बंडू राऊत, गणेश घोरमाडे, पुरुषोत्तम व्यास, उमेश चौधरी, त्यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता महावितरण प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि प्रत्यक्ष कामांना कधी सुरुवात होते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.







