वर्धा :- दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या वीजविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणने विशेष व्यवस्था केली आहे. नागपूर जिल्ह्यात रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बिघाडासह इतर तातडीच्या वीजविषयक तक्रारींची नोंद घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी 7875761000 हा हेल्पलाईन क्रमांक 24 तास, सातही दिवस उपलब्ध करण्यात आले आहेत. यासोबतच नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची माहिती ‘महावितरण मोबाईल अॅप’ आणि महावितरण संकेतस्थळाद्वारे एका क्लिकवर नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा महत्त्वाचा असल्याने रोहित्र बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने तक्रार निवारणासाठी समन्वय यंत्रणा कार्यान्वित केली आहे. हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन नागपूर जिल्ह्यातील संबंधित महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार आहे, जेणेकरून बिघाड दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करता येईल.
मोबाईल अॅपवरून एका क्लिकमध्ये रोहित्र बिघाडाची नोंद:
नागपुर जिल्ह्यातील शेतकरी तसेच सर्वसामान्य वीजग्राहकांना नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची माहिती थेट ‘महावितरण मोबाईल अॅप’द्वारे देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरणचे नागपूर जिल्ह्यात तब्बल 79 हजार 911 कृषी ग्राहक असून 2 हजारापेक्षा अधिक सिंगल फेज वितरण रोहित्रे आहेत. यापैकी बहुतांश रोहीत्रांचे जिओ-लोकेशनसह मॅपिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे संबंधित रोहित्राचे अचूक ठिकाण निश्चित करून त्याच्या बिघाडाची माहिती देणे अधिक सुलभ झाले आहे.
या सुविधेचा वापर करण्यासाठी ग्राहक क्रमांकाद्वारे लॉगिन करता येते किंवा गेस्ट म्हणूनही तक्रार नोंदविता येते. तक्रार नोंदविताना संबंधित रोहित्राच्या ठिकाणाजवळ असणे, मोबाईलचे लोकेशन सुरू ठेवणे आणि अॅपला लोकेशनची परवानगी देणे आवश्यक आहे. अॅपमधील ‘नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा’ हा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरावी, संबंधित रोहित्राचा फोटो काढावा आणि नोंदणी पूर्ण करावी. ही माहिती संबंधित अभियंता व जनमित्रांपर्यंत पोहोचल्याने रोहित्राची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती किंवा बदल करण्यासाठी कार्यवाही करता येते. तक्रारीवरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराला व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांकावरूनही ही सुविधा:
मोबाईल अॅपव्यतिरिक्त महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर, संबंधित महावितरण कार्यालयात किंवा ग्राहक सुविधा केंद्रातही तक्रार नोंदविता येते. तसेच महावितरणच्या 24 तास सुरू असलेल्या कॉल सेंटरच्या 18002123435, 18002333435, 1912 आणि 19120 या क्रमांकांवर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. संकेतस्थळ तसेच मोबाईल अॅपवरील ‘ऊर्जा चॅटबॉट’द्वारेही मराठी आणि इंग्रजी भाषेत तक्रारी नोंदविता येतात.
नादुरुस्त रोहित्राची माहिती वेळेत मिळाल्यास संबंधित यंत्रणेला बिघाडाचे ठिकाण शोधणे आणि दुरुस्ती किंवा रोहित्र बदलण्याची कार्यवाही करणे अधिक सुलभ होते. त्यामुळे शेतकरी व वीजग्राहकांनी रोहित्र बिघाड किंवा इतर तातडीच्या वीजविषयक समस्यांसाठी उपलब्ध हेल्पलाईन, मोबाईल अॅप, संकेतस्थळ किंवा टोल फ्री क्रमांकांचा वापर करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.








