– लोकमान्य मंडळाचे शौर्य शिबिर उत्साहात संपन्न:
नागपूर:- लोकमान्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळ, नागपूर तर्फे मिशन मृत्युंजय अंतर्गत शौर्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. रेशीमबागेतील पाण्याच्या टाकीजवळील लोकमान्य परिसर येथे शिबिर दि.३ ते १७ मे दरम्यान घेण्यात आले. या शिबिरात शिबिरार्थ्यांना रायफल शूटिंग, धनुर्विद्या (आर्चरी), दंडयुध्द प्रशिक्षण, कराटे व स्व संरक्षणाचे धडे देण्यात आले. या दरम्यान पोलीस प्रशासनाचे बॉम्ब शोधक- नाशक पथक, मनपा अग्निशमन दल आदी अनेक तज्ञांतर्फे शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शिबिराला हनुमान नगर झोन सभापती ज्योतीताई देवघरे, नेहरू नगर झोन सभापती सीमाताई ढोमणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नंदनवन भाग संघचालक अशोक बुजोणे व इतर पदाधिकारी, अनेक नगरसेवक व समाजातील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या. रविवारी शिबिराच्या समारोपाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यात शिबिरार्थ्यांनी सर्व युद्ध प्रात्यक्षिके तसेच देशभक्तीपर नाटिका सादर करून उपस्थित सर्व पालकांना मंत्रमुग्ध केले. भारतमातेच्या नाऱ्यांनी अवघा परिसर अक्षरशः दुमदुमला होता. यानंतर दीप प्रज्वलन करून भारतमातेच्या व लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मंचावर मनपा जलप्रदाय विभाग समितीच्या सभापती दिव्या धुरडे, नगरसेवक चंद्रकांत खंगार, नगरसेविका मानसी सिमले, डॉ. भालचंद्र भांडारकर, मंडळाचे अध्यक्ष ॲड. रमण सेनाड, सचिव आशुतोष शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. दिव्या धुरडे यांनी आपल्या उद्बोधनात अशा शिबिरांचे आयोजन होणे, ही काळाची गरज असल्याचे म्हटले. तसेच या स्तुत्य उपक्रमासाठी आयोजकांचे कौतुक करून त्यांनी शिबिरार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ॲड.रमण सेनाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मंडळाच्या इतिहासाविषयी व इतर उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी शिबिरार्थींना अभ्यासा सोबत राष्ट्रभक्तीचे धडे गिरविण्याचा मोलाचा सल्ला दिला व त्यांच्या भविष्यातील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्यात व मार्गदर्शन केले. शिक्षण आणि करिअर सोबतच राष्ट्रनिर्मिती आणि स्वरक्षणासाठी तरुण पिढीला उद्युक्त करणे व प्रोत्साहित करणे यासाठी लोकमान्य मंडळ गेली 30 वर्षे कार्यरत असल्याचे ते म्हणाले. तसेच पालकांनी मंडळावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी पालकांचे आभार व्यक्त केले ॲड. ऋग्वेद सेनाड यांनी प्रास्ताविक भाषणात शिबिरामागचे उद्दिष्ट आणि महत्त्व विशद करून तब्बल 2 दशके मंडळाने केलेला संघर्ष, त्यातून मिळालेले यश आदी अनेक आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी शिबिराचे मुख्य प्रशिक्षक डॉ. नितीन गुल्हाने व ज्येष्ठ चिकित्सक डॉ. भांडारकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच युसुफ सैय्यद, चारुदत्त बान्ते, रमाकांत गिल्लुरकर, शशी ठाकूर, डॉ. आनंद जोशी सुमित राजा, या प्रशिक्षकांचा देखील गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिबिरार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तुषार कोंडलकर तर आभार मेघा निचंते यांनी मानले. यशस्वीतेसाठी ॲड.राजेंद्र गिल्लुरकर, संजय काळे, राजेश नाईक, स्वप्निल वराडे, मिलिंद चव्हाण, शैलेंद्र गाडगे, अबोली कोंडलकर, गौरव वऱ्हाडे आदींनी अथक परिश्रम घेतले.