यवतमाळ :- यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, नेर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा कामनदेव येथील कामानादेवी मंदिर येथे मानव-वन्यजीव संघर्षामुळे बाधित झालेल्या व्यक्तींकरीता योजना 2025 या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दिपक एच. दाभाडे होते. नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोतीराम आडे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर प्रमुख वक्ते म्हणून नोडल अधिकारी तथा पॅरा विधी स्वयंसेवक वासुदेव विधाते यांनी उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दिपक एच. दाभाडे यांनी मानव-वन्यजीव संघर्ष रोख्ण्यासाठी व नुकसानग्रस्त नागरिकंना भरपाई मिळावी, यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत व सक्षम विधी सेवा कशी मिळविता येईल, याबाबतही उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी मोतीराम आडे यांनी वनविभागातील कार्यानुभव सांगताना मानव-वन्यजीव संघर्षातील बाधितांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
नोडल अधिकारी वासुदेव विधाते यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानव आणि वन्यजीवांचे सहअस्तित्व महत्त्वाचे असल्याचे सांगितले. वन्यजीवांच्या अधिवासामध्ये अतिक्रमण झाल्याने वन्यजीव मानवी वस्त्यांजवळ आढळून येत आहे. दिवसेंदिवस मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. या संघर्षात मानवी जीवितहानी, गंभीर दुखापती, पाळीव प्राण्यांवरील हल्ले आणि आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. अशा संघर्षामुळे बाधित नागरिकांना तातडीने वैद्यकीय उपचार, आर्थिक नुकसानभरपाई, पुनर्वसन आणि मोफत विधी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत “मानव-वन्यजीव संघर्ष योजना” राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनसंरक्षक पी. जे. अहिर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामस्थ रंगराव राठोड यांनी केले. शिबिराला कामनदेव तसेच परिसरातील नागरिक आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





