spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तृतीयपंथीयांनाही सन्मानाने जगू द्या

– निकुंज जोशी, आंचल वर्मा यांचे कळकळीचे आवाहन

– माहिती व जनसंपर्क विभागातर्फे संवाद

नागपूर :- स्त्री आणि पुरुष यांच्याप्रमाणेच तृतीयपंथी किंवा किन्नर देखील एक माणूसच आहे. त्यामुळे आमच्याकडे वेगळ्या नजरेने न पाहता आम्हालाही सन्मानाने जगू द्यावे, असे कळकळीचे आवाहन एलजीबीटींसाठी (लेस्बियन, गे, बायसेक्सुअल, ट्रांसजेंडर) काम करणाऱ्या सारथी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निकुंज जोशी आणि किन्नर प्रतिनिधी आंचल वर्मा यांनी केले. माहिती व जनसंपर्क विभागातर्फे आज संचालक कार्यालयात आयोजित संवाद या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

समलैंगिक, तृतीयपंथी तसेच या समुदायाताली अन्य घटक मिळून एलजीबीटी समुदाय तयार होतो असे सांगून निकुंज जोशी म्हणाले की, एलजीबीटी शब्द अनेकांनी ऐेकला असतो, पण ते नेमके काय आहे हे माहिती नसते. जनजागृती नसल्यामुळे या समुदायातील लोकांना समाजात स्वीकारले जात नाही. त्यामुळे अनंत अडचणींचा सामना करीत आम्हाला जगावे लागते. फक्त शारीरिक संबंध म्हणजे लैंगिक शिक्षण नव्हे तर हा खूप मोठा विषय आहे आणि त्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. तरच समाजातील असमानता संपू शकेल. आमच्याबाबत निसर्ग किंवा देवाने भेदभाव केला नाही पण माणूस मात्र समाज आणि आमच्यात भेदभाव करतो हे दुर्दैवी असल्याचे जोशी म्हणाले. या समुदायातील मूल कोणाच्याही घरात जन्माला येऊ शकते. तसे झालेच तर त्याच्या मागे पालक म्हणून भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आंचल वर्मा म्हणाल्या की, महाभारत, रामायण कळातही किन्नरांना सन्मानाची वागणूक मिळत होती. त्याचे दाखले पुराणांमध्ये मिळतात. मात्र आजची परिस्थिती भीषण आहे. किन्नर किंवा तृतीयपंथी हा टिंगल टवाळी, उपेक्षा यांचा बळी ठरत आहे. किन्नरांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र प्रसाधनगृह, रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तसेच कारागृहात स्वतंत्र कोठडी आवश्यक असल्याचे वर्मा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किन्नरांसाठी स्वतंत्र महामंडळ गठित केले व त्या माध्यमातून त्यांच्यासाठीच्या सुविधांची पायाभरणी केली. त्याचे लाभ मिळणे सुरू झाले आहे, असे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले. तृतीयपंथी हे देखील आपल्याच समाजाचे घटक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचे आवाहनही डॉ. मुळे यांनी यावेळी केले. संचालक कार्यालयातील आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Popular Articles