– जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन
यवतमाळ :- राज्य शासनाने अद्याप दुष्काळग्रस्त तालुक्यांची कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. मात्र, समाजमाध्यमांवर दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी म्हणून एक यादी मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. ही यादी बनावट व फेक असून, शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुक्याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. अशा परिस्थितीत समाजमाध्यम, वृत्तपत्रांमध्ये प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आणि चिंता निर्माण होत आहे. शासनाने दुष्काळग्रस्त (ट्रिगर) तालुक्यांची कोणतीही यादी जारी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत शासकीय माहितीशिवाय कोणत्याही यादीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
“शेतकऱ्यांच्या भावनांशी कुणीही खेळू नये”
दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत शासनाकडून अधिकृत निर्णय किंवा यादी जाहीर झाल्यानंतरच त्याबाबतची माहिती प्रशासनामार्फत प्रसिद्ध केली जाईल. तोपर्यंत समाजमाध्यमांवरील अप्रमाणित संदेश किंवा माहिती आणि याद्या पुढे प्रसारित करू नयेत. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणारा खोडसाळपणा टाळावा, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी दुष्काळ किंवा अनुदानासंदर्भातील कोणतीही माहिती मिळाल्यास ती अधिकृत शासकीय संकेतस्थळे, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विभागाच्या अधिकृत माध्यमांतून तपासून घ्यावी. अफवा पसरविणाऱ्या संदेश व माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच ते पुढे प्रसारित करू नयेत, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





