खापा, वार्ताहर :- लोकमान्य विद्यालय, बडेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जयंती सोहळ्यासोबतच सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, ग्रामसफाई व अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या विचारांवर मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पुरुषोत्तम मुंडे, मुख्याध्यापक गजानन कुरवाडे, शिक्षक सुरेंद्र बनसिंगे, नितीन निरगुडे व विजय गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायत बडेगावच्या सरपंच ज्योती चौधरी यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या वेशभूषेत देवांशू मनोज प्रजापती याने महात्मा गांधी, तर अतुल गौतम बागडे याने संत गाडगे महाराज यांची भूमिका साकारली. त्यांच्या वेशभूषेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
सेवा संकल्प अभियानातून ग्रामसफाई
जयंतीनिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियानात विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशाताईंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लोकमान्य विद्यालयापासून ग्रामपंचायत कार्यालय, बडेगावपर्यंतच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
तसेच महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांची अहिंसा रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे शांतता, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
ग्रामपंचायत बडेगावच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक दिलीप इंगोले यांनी केले. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.








