खापा, वार्ताहर :– राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त खापा शहरातील बाजार चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक- नगरसेविका, कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.
दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता बाजार चौकातील गांधी पुतळ्याजवळ कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता व सामाजिक एकात्मतेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.
याप्रसंगी नगर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सुरेश चंद्रवंशी, सेवादल अध्यक्ष नारायण लांबट, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुकेश पावडे, नगरसेवक छगन कवळे, तसेच नगरसेविका वैशाली लाड, कविता धराडे, मनोरमा श्रियाम, माजी नगरसेविका अनिता हरडे, शकुन गिरडकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक दंदे, व्यंकटेश तालपल्लिवार, योगेश गोखे, रमेश लष्करे यांच्यासह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व राष्ट्रनिर्माणात दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमामुळे बाजार चौकात राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.








