– माजी सैनिकांच्या भव्य मिरवणुकीने कामठी दुमदुमले
– वीरमाता, वीरपत्नी व माजी सैनिकांचा सन्मान; कौटुंबिक स्नेहमेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कामठी :- महार रेजिमेंट स्थापना दिवस आणि प्रथम महार बटालियन रेजिंग डेचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच माजी सैनिक संघटना, नागपूर यांच्या वतीने गुरुवारी (१ ऑक्टोबर) भिलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज संस्कृत भवन येथे महार रेजिमेंट स्थापना दिवस, कौटुंबिक स्नेहमेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशसेवेचा अभिमान, सैनिकांच्या शौर्याला सलाम आणि कुटुंबीयांच्या स्नेहबंधाचा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी सैनिकांच्या सहभागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. लष्करी गणवेशातील माजी सैनिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभाग घेतला. हातात विविध संदेशांचे फलक आणि महार रेजिमेंटच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक असलेले बॅनर घेऊन माजी सैनिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ‘जयभीम, जय महार’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीत नागरिक, महिला, मुले तसेच सैनिकांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. देशसेवेत शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांचा तसेच वीरमाता, वीरपत्नी आणि शौर्यपदक विजेत्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सैनिकांच्या त्यागामागे उभ्या असलेल्या कुटुंबीयांच्या योगदानालाही यावेळी विशेष आदर देण्यात आला.
या सोहळ्याला सेवानिवृत्त आयएएस अधिकारी ई. झेड. खोब्रागडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कॅप्टन दत्ता गवई (से.नि.) यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी माजी सैनिकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत परस्परांशी स्नेहभेट घेतली.
दुपारच्या सत्रात कौटुंबिक स्नेहमेळावा आणि लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला सैनिकांचे शौर्य, शिस्त, त्याग आणि देशसेवेची प्रेरणा देण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष नायब सुभेदार पंजाब पाटील (से.नि.), सचिव सुभेदार सतेंद्रकुमार चवरे (से.नि.), कोषाध्यक्ष सुभेदार क्लार्क राजकुमार मेश्राम (से.नि.) आणि संयोजक कॅप्टन संजय खंडारे (से.नि.) यांच्यासह विचार मंचाच्या सर्व माजी सैनिकांनी परिश्रम घेतले. ‘महार गान’ आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








