नरखेड :- स्वकुल साळी समाज बांधवांच्या वतीने आद्य वस्त्रनिर्माते व शिवपुत्र भगवान जीव्हेश्वर यांचा जन्मोत्सव नरखेड येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवसीय जन्मोत्सवाची सुरुवात कलशस्थापना व भगवान जीव्हेश्वर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. महिलांच्या वतीने भजनसंध्या तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी मातामाई मंदिरात महादेवाची महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी रामकृष्ण भंदिर्गे यांनी भगवान जीव्हेश्वर पोथीचे वाचन केले. लीलाबाई भंदिर्गे, शालिनी ताई भंदिर्गे व रंजिता हिंगे यांनी पाळणा गायन केले. त्यानंतर हभप रामराव भोदे महाराज यांच्या अमृतवाणीतून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगांचे गायन करण्यात आले. तसेच तीर्थपूजन करण्यात आले.
समाजातील ज्येष्ठांचा सन्मान
जन्मोत्सवाचा समारोप सत्कार समारंभाने झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वकुल साळी समाजातील ज्येष्ठ नागरिक डॉ. सिद्धानंद कालाने होते. प्रमुख अतिथी म्हणून हरीश खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष अभिजीत गुप्ता, संजय चरडे, रामचंद्र तवले, अजय सोमकुवर, राजू होले, अभियंता संजय भागवत व सुनील बालपांडे उपस्थित होते.
यावेळी रामकृष्ण भंदिर्गे, मथुराबाई देव्हारे व कलावती तवले यांचा समाजातील ज्येष्ठ नागरिक म्हणून सन्मान करण्यात आला.
भगवान जीव्हेश्वर सेवा पुरस्कार प्रदान
स्वकुल साळी मंडळ, नरखेडच्या वतीने दरवर्षी समाज तसेच इतर समाजांसाठी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना भगवान जीव्हेश्वर सेवा पुरस्कार देण्यात येतो. यंदा नंदकिशोर खंडेलवाल यांना त्यांच्या कुटुंबाच्या औद्योगिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘नरखेड रत्न भगवान जीव्हेश्वर सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
समाजाचे दिवंगत ज्येष्ठ सदस्य स्व. श्यामराव हिंगे यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल मरणोत्तर ‘समाज रत्न भगवान जीव्हेश्वर सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच नरखेड नगर परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज कोरडे यांचा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थी व युवक-युवतींचा गौरव
विविध खासगी व शासकीय सेवांमध्ये निवड झाल्याबद्दल अमित मनोहर तवले व तृषाली अशोक गोडबोले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थी पायल संजय ढमाले, रितिका दिनेश बुरांडे, अश्विनी विनायक हिंगे, अथर्व चंद्रशेखर हिंगे, अनन्या मिलिंद कावलकर, आदित्य मिलिंद कावलकर, सानवी अतुल हिंगे व काश्वी सचिन हिंगे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला नरखेडसह पांढुर्णा, मोवाड व पुसला परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र तवले यांनी केले. संचालन स्वकुल साळी समाज मंडळ, नरखेडचे अध्यक्ष नरेश तवले यांनी केले, तर अनन्या मिलिंद कावलकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तमराव तवले, उपाध्यक्ष अतुल हिंगे, सचिव मिलिंद कावलकर, सहसचिव मनोहर तवले, कोषाध्यक्ष दिवाकर भंदिर्गे, कार्यकारी सदस्य अशोक गोडबोले, दिनेश बुरांडे, विजय कावलकर, पंकज हिंगे, विक्रांत तवले, रितिक हिंगे तसेच महिला सदस्या रंजिता हिंगे, रजनी तवले, अलका तवले व सीमा गोडबोले यांनी परिश्रम घेतले.





