महाज्योतीतर्फे फडणवीसांच्या हस्ते फुले दांपत्यांच्या वाङ्मयाचे प्रकाशन

0
127

 

मुंबई २७ : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत महात्मा जोतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्या मार्फत क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाङ्मयाचे भव्य प्रकाशन मंगळवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा ‘महाज्योती’ चे अध्यक्ष मा. अतुल सावे, ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे, ‘महाज्योती’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा. प्रशांत वावगे यांची उपस्थित होते. संचालक मंडळाच्या बैठकीत फुले दाम्पत्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्यापक पातळीवर व्हावा, या उद्देशाने त्यांचे एकत्रित समग्र महावाङ्मय प्रकाशित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.
या  समग्र  वाङ्मयामध्ये एकूण 1242 पृष्ठांचा अनमोल ठेवा असून महात्मा जोतीराव फुले यांचे 23 आणि सावित्रीबाई फुले यांचे 14 ग्रंथ, त्यांचे पत्रव्यवहार तसेच संबंधित कागदपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षणाचा अधिकार, शेतकऱ्यांचे प्रश्न, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता आणि धर्माचा खरा अर्थ या जीवनदृष्टीला दिशा देणाऱ्या विचारांचा यात संग्राह आहे. या ग्रंथाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे पुण्यातील महात्मा फुले वाडा तसेच साताऱ्यातील नायगाव येथील सावित्रीबाईंच्या जन्मगावातील रंगीत छायाचित्रांचा समावेश यात करण्यात आला आहे. उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या मान्यतेने हा ग्रंथ प्रकाशित झाला असून एकूण 27,000 प्रती छापण्यात आल्या आहेत.
प्रत्येक जिल्ह्यातील 750 प्रतींचे वितरण करण्याची जबाबदारी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या ग्रंथांचे वितरण जिल्हास्तरीय शिक्षण विभाग, आर्थिक विकास मंडळ तसेच आश्रमशाळा-वसतिगृहांमार्फत केले जाणार आहे. याशिवाय राज्यातील सर्व केंद्रीय व राज्य मंत्री, खासदार, आमदार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींपर्यंतही हा ग्रंथ पोहोचविला जाणार आहे. तसेच विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये विजयी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना हा ग्रंथ पारितोषिक स्वरूपात देण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना समाजपरिवर्तनासाठी नवी दिशा मिळेल. शासन स्तरावर प्रथमच फुले दाम्पत्यांच्या साहित्यावर आधारित इतक्या व्यापक प्रमाणात वाङ्मय प्रकाशित झाले आहे. समाजातील बहुजन वर्गाला आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या फुले दाम्पत्यांच्या विचारांचा प्रसार निश्चितच अधिक व्यापक होईल, अशी भावना मंत्री मा. अतुल सावे यांनी व्यक्त केली.

फुले दांपत्यांचा वारसा हा केवळ इतिहास नसून आजच्या समाजातील असमानतेवर प्रहार करणारा जिवंत मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांतून आपल्याला हे स्पष्ट शिकायला मिळते की, शिक्षण हेच खऱ्या अर्थाने मुक्तीचे शस्त्र आहे. स्त्रीशक्तीचे सबलीकरण हे समाजाच्या प्रगतीचे मूळ असून, अन्याय व अंधश्रद्धेविरुद्धचा संघर्ष थांबता कामा नये, हा त्यांचा ठाम संदेश आहे. आजच्या काळातही विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातीय भेदभाव या समाजाला पोखरत आहेत. अशा परिस्थितीत फुले दांपत्यांचे समग्र वाङ्मय म्हणजे नव्या पिढीसाठी दिशादर्शक दीपस्तंभ ठरणार आहे, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा ‘महाज्योती’ चे अध्यक्ष मा. अतुल सावे यांनी व्यक्त केला.