– बेल्जियमचे महावाणिज्यदूत पीर स्टीवरलिंक यांनी घेतली सदिच्छा भेट
मुंबई :- बेल्जियमसोबत सागरी वाहतूक, लॉजिस्टिक्स, रत्ने-दागिने, मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञान अशा नव्या क्षेत्रांत व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढविण्यासाठी संभाव्य प्रकल्प व भागीदारीची क्षेत्रे संयुक्तपणे निश्चित करावीत, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
बेल्जियमचे महावाणिज्यदूत पीर स्टीवरलिंक यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री रावल यांची भेट घेतली. भारत आणि बेल्जियममधील उच्चस्तरीय भेटींमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले असून, महाराष्ट्राने उद्योग आणि व्यापारवाढीच्या संधींचा लाभ घ्यावा, असे मंत्री रावल यांनी सांगितले.
राज्यातील वाढवण बंदर परिसरात प्रस्तावित विशाल बाजारपेठ प्रकल्पाभोवती कृषी-अन्नप्रक्रिया, लॉजिस्टिक्स आणि पूरक उद्योगांची एकात्मिक परिसंस्था विकसित करण्याची संधी आहे. या प्रकल्पात बेल्जियममधील संबंधित कंपन्यांच्या सहभागाची शक्यता पडताळून पाहता येईल, असेही मंत्री रावल यांनी नमूद केले.
अँटवर्प-ब्रुज बंदराचे सागरी वाहतूक, बहुपर्यायी दळणवळण, बंदर व्यवस्थापन, डिजिटायझेशन, अंतर्देशीय जलमार्ग, ड्रेजिंग आणि समुद्रातील पवनऊर्जा प्रकल्पांमध्ये विशेष कौशल्य असल्याची माहिती महावाणिज्यदूत स्टीवरलिंक यांनी दिली. सागरी क्षेत्रातील कंपनांचे शिष्टमंडळ भारताला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबईतील प्रस्तावित रत्ने व दागिने केंद्रासाठी बेल्जियममधील डिझाइन कौशल्याचा उपयोग करता येईल. भारतीय हिरे व्यावसायिक आणि अँटवर्पमधील दीर्घकालीन संबंधांच्या आधारे रत्ने व दागिने क्षेत्रातील सहकार्य अधिक व्यापक करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक, धातू, बॅटरी व इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे पुनर्चक्रण तसेच मायक्रोप्रोसेसरच्या संशोधन-विकास क्षेत्रात बेल्जियमकडे असलेल्या तंत्रज्ञानाचा महाराष्ट्राला लाभ होऊ शकतो यावरही यावेळी विचारविनिमय झाला. त्याचप्रमाणे भारत-बेल्जियम राजनैतिक संबंधांना ६० वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रस्तावित भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार करारामुळे विविध क्षेत्रांतील व्यापाराच्या संभाव्य संधींवरही यावेळी चर्चा झाली.








