हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र पोलीस दलाच्या ‘रेझिंग डे’ (वर्धापन दिन) सप्ताहाचे औचित्य साधून भंडारा सायबर पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी मोठी कामगिरी केली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढलेले सुमारे ३० महागडे मोबाईल संच अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही काळापासून विविध ठिकाणांहून मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी सायबर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या या तक्रारींची गंभीर दखल घेत, पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी विशेष शोध मोहीम हाती घेतली होती.
सहा. पोलीस निरीक्षक पाटील आणि त्यांच्या पथकाने भारत सरकारच्या ‘CEIR’ (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर आणि प्रगत तांत्रिक विश्लेषण करून या गहाळ मोबाईलचा शोध सुरू केला. सायबर पथकाच्या अथक परिश्रमानंतर ३० मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी सायबर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. आपले हरवलेले महागडे मोबाईल पुन्हा हाती मिळाल्याने नागरिकांनी पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स.पो.नि. पाटील आणि सायबर पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाने पार पाडली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.




