नागपूर :- मे महिन्यातील अतिउष्णतेची लाट आणि अचानक ओढवलेल्या दोन वेगवेगळ्या तांत्रिक संकटांवर मात करत महावितरणने नागपूरकरांना मोठा दिलासा दिला आहे. शहरातील वाठोडा आणि आशीर्वाद नगर परिसरात लागोपाठ झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर महावितरणच्या तांत्रिक पथकाने रात्रभर आणि युद्धपातळीवर अथक परिश्रम करून दोन्ही भागांतील वीज पुरवठा अत्यंत तत्परतेने पूर्ववत केला आहे.
पहिली घटना 25 मे रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे घडली, जिथे मनपाच्या जेसीबीमुळे 11 केव्ही वाठोडा स्विचिंग उपकेंद्राची मुख्य भूमिगत केबल तुटली. या उपकेंद्रावरून सुमारे 20 हजार ग्राहकांना वीज पुरवठा होतो. महावितरणने तातडीने हा भार दुसऱ्या वाहिनीवर वळवला, मात्र अवघ्या अर्ध्या तासात गोएनेका ले-आऊटजवळ ही दुसरी वाहिनीही दोन ठिकाणी नादुरुस्त झाली. विक्रमी उन्हाळ्यामुळे विजेची मागणी सर्वोच्च पातळीवर असताना दोन्ही मुख्य वाहिन्या एकाच वेळी खंडित झाल्याने मोठे आव्हान निर्माण झाले होते. महावितरणने तात्काळ 16 हजार ग्राहकांचा भार इतर उपकेंद्रांवर वळवून दिलासा दिला. उर्वरित 4 हजार ग्राहकांसाठी रात्री 9 ते पहाटे 3 वाजेपर्यंत चक्रपद्धतीने तात्पुरते भारव्यवस्थापन करण्यात आले. या आव्हानात्मक परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात दुरुस्तीचे काम पूर्ण करून 26 मे रोजी पहाटे 3:15 वाजता दोन्ही केबल पूर्ववत जोडल्या आणि वाठोडा परिसराचा पुरवठा सुरळीत केला.
दुसरीकडे, आशीर्वाद नगर येथील एनआयटी कॉम्प्लेक्स परिसरात 25 मे रोजीच पहाटे 4:30 वाजता 200 केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रान्सफॉर्मर, वितरण पेटी आणि केबल्स जळून खाक झाल्या, तसेच शेजारी पार्क केलेल्या गॅरेजमधील चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून उदय नगर फीडरचा पुरवठा काही काळ बंद ठेवावा लागल्याने परिसरातील 250 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तीव्र उन्हाळ्याचे गांभीर्य ओळखून महावितरणच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नवीन ट्रान्सफॉर्मर आणि केबल्स बदलण्याचे काम हाती घेतले. कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे दुपारी 2:30 वाजेपर्यंत सर्व तांत्रिक कामे पूर्ण होऊन येथील वीज पुरवठा यशस्वीरीत्या पूर्ववत करण्यात आला. या दोन्ही घटनेची अधिकृत माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयाला देण्यात आली असून, महावितरणच्या या जलद आणि सकारात्मक कामगिरीबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे.