नागपूर जिल्ह्यात महावितरणचा दणका: 1.37 कोटींच्या 1,054 वीजचोऱ्या उघडकीस

0
16

नागपूर :- वीजचोरीला पूर्णपणे पायबंद घालून प्रामाणिक वीजग्राहकांचे हित जपणे आणि महावितरणच्या महसुली सुरक्षेला बळकटी देणे या दुहेरी उद्दिष्टाने नागपूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाले आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2026 या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहर अशा दोन्ही मंडलांमध्ये (Circle) अत्यंत नियोजनबद्ध व कडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान महावितरणच्या विशेष पथकांनी तब्बल 1,054 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली असून, यामध्ये सुमारे 1.37 कोटी रुपये मूल्याच्या 6.38 लाख युनिट्स विजेचा बेकायदेशीर वापर उघडकीस आला आहे.

महावितरणने पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम वीज वितरण व्यवस्थेसाठी राबवलेल्या या मोहिमेअंतर्गत नागपूर ग्रामीण मंडलात 583, तर नागपूर शहर मंडलात 471 प्रकरणांचा यशस्वीरीत्या छडा लावला. वीज वितरण प्रणालीच्या मुख्य वाहिन्यांवर थेट आकडे टाकून वीज घेणे, अनधिकृत केबल्सचा वापर करणे आणि विजेच्या मीटरमध्ये तांत्रिक छेडछाड करून वीज वापरणे अशा विविध प्रकारच्या चोऱ्या या पाहणीत समोर आल्या आहेत. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एप्रिल ते जुलै या पहिल्या चार महिन्यांत 689 प्रकरणे पकडण्यात आली होती; तर महावितरणच्या पथकांनी ऑगस्ट महिन्यात मोहिमेची तीव्रता अचानक वाढवत एकाच महिन्यात तब्बल 365 वीजचोऱ्या उघडकीस आणून मोठा दणका दिला.

जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये राबवण्यात आलेल्या या व्यापक कारवाईत मौदा विभागाने सर्वाधिक 214 वीजचोऱ्या पकडल्या. त्याखालोखाल औद्योगिक व ग्रामीण क्षेत्राचा समावेश असलेल्या बुटीबोरी विभागात 158 प्रकरणे उघडकीस आली. याशिवाय उमरेड विभागात 133, सावनेर विभागात 131, सिव्हिल लाईन्स विभागात 117, काटोल विभागात 115, गांधीबाग विभागात 99, काँग्रेस नगर विभागात 57 आणि महाल विभागात 40 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.

वीजचोरी उघडकीस आल्यानंतर महावितरणने भारतीय वीज कायदा 2003 च्या कलम 135 आणि 138 अन्वये अत्यंत कठोर कायदेशीर पावले उचलली आहेत. या कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, वीजचोरी पकडण्यात आलेल्या एकूण 1,054 ग्राहकांपैकी 599 ग्राहकांनी वीज बिल व दंडापोटी सुमारे 81.5 लाख रुपयांच्या रक्कमेचा महावितरणकडे तत्परतेने भरणा केला आहे. तसेच, नियमानुसार कायदेशीर खटल्याची गुंतागुंत टाळण्यासाठी 503 ग्राहकांना तडजोड शुल्काचे (Compounding Charge) देयक आकारण्यात आले आहे. मात्र, महावितरणच्या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या आणि सहकार्य न करणाऱ्या 2 ग्राहकांवर थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीजचोरी विरोधातील महावितरणची ही मोहीम यापुढील काळात अधिक आक्रमकतेने राबविली जाणार आहे. आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता, संभाव्य कठोर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी विजेचा वापर केवळ अधिकृत पद्धतीनेच करावा तसेच आपल्या नियमित वीजबिलाचा वेळेवर भरणा करावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वीजचोरी हा भारतीय कायद्यनुसार गंभीर व दखलपात्र गुन्हा असून, गुन्ह्याचे स्वरूप आणि चोरीच्या तीव्रतेनुसार दोषींवर मोठा आर्थिक दंड तसेच तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बेकायदेशीरपणे घेतलेल्या वीज जोडण्यांमुळे किंवा थेट आकडे टाकल्यामुळे वीज यंत्रणेवर अनपेक्षित ताण येतो; ज्यामुळे शॉर्ट सर्किट, रोहित्रांची (Transformer) खराबी आणि आगीच्या गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका असतो. यामुळे केवळ महावितरणचे नुकसान होत नसून सर्वसामान्यांच्या जीवित व वित्ताची मोठी हानी होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा बेकायदेशीर मार्गाचा वापर न करता केवळ महावितरणच्या अधिकृत प्रणालीद्वारेच सुरक्षित वीज जोडणी घ्यावी, असे स्पष्ट आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे. तसेच, आपल्या परिसरात कुठेही वीजचोरी किंवा वीज यंत्रणेशी छेडछाड होत असल्याचे निदर्शनास आल्यास, नागरिकांनी त्याबाबतची माहिती तत्काळ महावितरणला देऊन एका जबाबदार नागरिकाची भूमिका बजावावी, असे आवाहन देखील महावितरणने केले आहे.