डॉल्बी-डीजेवरील निर्बंधांबाबत पुनर्विचार करून सण-उत्सवांसाठी नियमानुसार सवलत द्यावी

0
16

– भाविकांच्या धार्मिक भावना आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल साधण्याची आ. कृपाल तुमाने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नागपूर :-  नागपूर शहरात दि. १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत डॉल्बी व डीजेच्या वापरावर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांबाबत पुनर्विचार करून आगामी हिंदू सण-उत्सवांच्या कालावधीत नियमानुसार आवश्यक ती सवलत अथवा विशेष परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार, माजी खासदार रामटेक लोकसभा आणि शिवसेनेचे उपनेते आ. कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डॉल्बी व डीजेच्या वापराबाबत दि. १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत निर्बंध लागू करण्याची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा पूर्ण आदर आहे, असे स्पष्ट करत आ. तुमाने यांनी मात्र सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा संवेदनशीलतेने पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

याच कालावधीत दहीहंडी, श्री गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, धम्मचक्र परिवर्तनदिन, दिवाळी तसेच इतर महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत. या उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांसोबत ध्वनिवर्धक, डीजे आदींचा मर्यादित, नियंत्रित आणि नियमांच्या चौकटीत होणारा वापर हा उत्सवाच्या वातावरणाचा एक भाग बनला आहे.

दीर्घ कालावधीसाठी डीजे व डॉल्बीवर संपूर्ण निर्बंध राहिल्यास उत्सव मंडळे, आयोजक, कलाकार, संबंधित व्यावसायिक तसेच सर्वसामान्य भाविकांच्या उत्साहावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून उत्साहाने साजरे होणाऱ्या उत्सवांची रंगत कमी होऊन भाविकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते.

त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन कायम ठेवून, उत्सवांच्या ठरावीक दिवशी नियंत्रित पद्धतीने डीजे/ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्याबाबत संबंधित प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी आ. तुमाने यांनी केली आहे.

“नियमांचे पालन आणि नागरिकांच्या भावनांचा सन्मान यामध्ये योग्य समतोल साधणे शक्य आहे. प्रशासनाने नागरिकांची सुरक्षितता व ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी करतानाच सण-उत्सवांचा आनंद आणि धार्मिक भावनांचाही विचार करावा. सण-उत्सवांचा आनंद सर्वसामान्य भाविकांकडून हिरावला जाऊ नये,” अशी भूमिका आ. कृपाल तुमाने यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित प्रशासनास आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा आ. तुमाने यांनी व्यक्त केली.

आ. कृपाल तुमाने यांची प्रमुख मागणी

▪️ दि. १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू असलेल्या डॉल्बी-डीजे निर्बंधांचा सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुनर्विचार करावा.

▪️ दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी उत्सवांच्या ठरावीक दिवशी नियमानुसार डीजे/ध्वनिवर्धक वापरण्यास सशर्त परवानगी द्यावी.

▪️ ध्वनिप्रदूषण व कायदा-सुव्यवस्थेचे सर्व नियम कायम ठेवून नियंत्रित स्वरूपात आवश्यक ती सवलत द्यावी.

▪️ प्रशासनाची भूमिका आणि भाविकांच्या धार्मिक भावना यांच्यात योग्य समतोल साधावा.

▪️ सर्वसामान्य नागरिक, उत्सव मंडळे व भाविकांच्या उत्साहाला बाधा येणार नाही, यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा.