spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पांढरकवडा हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

– ४ पिकअप वाहनांमधून ४० गोवंशीय जनावरांची सुटका, ४२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा :- स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने पांढरकवडा पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर-हैद्राबाद महामार्गावर मोठी कारवाई करत कत्तलीकरिता नेले जाणारे ४० गोवंशीय जनावरे जप्त केले आहेत. या कारवाईत ४ पिकअप वाहनांसह एकूण ४२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी ११ जणांविरुद्ध पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात पेट्रोलींग करत असताना, गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, चार बोलेरो पिकअप वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे निर्दयपणे कोंबून कत्तलीकरिता नागपूरकडून हैद्राबादकडे नेण्यात येत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील साखरा गावाजवळ नाकाबंदी केली.

दरम्यान, नागपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या चारही पिकअप वाहनांना थांबवण्याचा इशारा दिला असता, चालकांनी वाहने न थांबवता पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून साखरा शिवारातील हरीयाणा मेवात सरपंचा ढाब्याच्या पार्किंगमध्ये एक वाहन पकडले, तर इतर चालक वाहने सोडून पसार झाले. पकडलेल्या चालकाचे नाव प्रणय निरंजन सगुणे (वय २०, रा. गोरेवाडा वस्ती, नागपूर) असे असल्याचे समोर आले. चारही वाहनांची पाहणी केली असता, त्यामध्ये एकूण ४० गोवंशीय बैल, व गाई आखूड दोरीने आणि कमी जागेत दाटीवाटीने कोंबून ठेवल्याचे आढळले. जनावरांना हालचाल करण्यास पुरेशी जागा नव्हती, तसेच वरून जाड तादपत्रीने हवा व प्रकाश येणार नाही अशा प्रकारे बंदिस्त केल्यामुळे जनावरे उष्णतेने व्याकुळ व वेदनादायक स्थितीत आढळली. पोलिसांनी १२ लाख ७० हजार रुपये किमतीची जनावरे आणि २९ लाख ५० हजार रुपये किमतीची ४ पिकअप वाहने असा एकूण ४२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह

दरम्यान, ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने येऊन पांढरकवडा पोलीस स्टेशन हद्दीत केली आहे. मात्र, अशा प्रकारची अवैध तस्करी पांढरकवडा पोलिसांच्या हद्दीत सातत्याने सुरू असतानाही स्थानिक पांढरकवडा पोलीस का दुर्लक्ष करत आहेत? आणि ते अशी कारवाई का करत नाहीत? अशी चर्चा व उलटसुलट बोलणी आता नागरिकांमधून ऐकायला मिळत आहेत.

सदर गुन्ह्यात एकूण ११ आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागवणे अधिनियम व प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांच्या पथकाने पार पाडली.

Popular Articles