संदीप कांबळे, कामठी :- विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेनंतर ३१ ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीने कामठी तालुक्याच्या राजकीय वर्तुळाला अक्षरशः हादरा दिला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातील कामठी तालुक्यातील शहर व ग्रामीण भाग मिळून पूर्वी २ लाख ५६ हजार ४०४ असलेली मतदारसंख्या थेट १ लाख ८७ हजार ९६० वर आली आहे. म्हणजेच तब्बल ६८ हजार ४४४ मतदारांची घट झाली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारसंख्या कमी झाल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत असून, ६८ हजार ४४४ नावे नेमकी कोणत्या कारणांमुळे कमी झाली? त्यातील किती मतदार मृत, स्थलांतरित, दुबार अथवा अन्य कारणांमुळे वगळण्यात आले? याचा कारणनिहाय तपशील प्रशासनाने जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.तर
कामठी नगर परिषद क्षेत्रातील मतदारसंख्येत झालेली घट ही विशेष लक्षवेधी ठरली आहे. पूर्वी ८९ हजार ७०६ मतदार असलेल्या कामठी शहराची संख्या प्रारूप यादीत ५८ हजार ४७९ वर आली आहे. म्हणजेच शहरातील मतदारसंख्येत तब्बल ३१ हजार २२७ मतदारांची घट झाली आहे.
येरखेडा नगर पंचायत क्षेत्रात पूर्वी १९ हजार १६४ मतदार होते. प्रारूप यादीत ही संख्या १३ हजार ७२३ झाली आहे. महादुला नगर पंचायत क्षेत्रातील मतदारसंख्या पूर्वी २२ हजारांहून अधिक होती; ती आता १६ हजार ९९३ इतकी नोंदविण्यात आली आहे.
बिडगाव नगर पंचायत क्षेत्रातही पूर्वीचे १६ हजार ९६३ मतदार कमी होऊन प्रारूप यादीत १३ हजार ६८२ मतदारांची नोंद झाली आहे.
कामठीसह ग्रामीण भागातील एकूण १ लाख ७ हजार ३९९ मतदारांपैकी प्रारूप मतदार यादीत ८५ हजार ८३ मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारसंख्येतही मोठी घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.
SIR प्रक्रियेदरम्यान मृत, स्थलांतरित, दुबार नोंदणी असलेले किंवा प्रत्यक्ष पडताळणीमध्ये आढळून न आलेल्या मतदारांच्या नोंदींची छाननी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंख्या घटण्यामागे विविध प्रशासकीय कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
जर या प्रारूप मतदार यादीतून पात्र मतदारांचे नाव वगळले असले तर जबाबदार कोण ठरणार? असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
. मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्याने प्रत्येक वगळलेल्या नोंदीची पारदर्शकपणे पडताळणी होणे आवश्यक आहे.
प्रारूप यादी अंतिम नसल्याने पात्र मतदारांना आपले नाव यादीत नसल्यास ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र मतदाराचे नाव प्रारूप यादीत आहे की नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे.कामठी तालुक्यातील ६८ हजार ४४४ मतदारांची घट हा केवळ आकडा नसून लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे वगळलेल्या मतदारांची कारणनिहाय आकडेवारी, पडताळणीची प्रक्रिया आणि पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक आहे.
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी पात्र मतदाराचे नाव कोणत्याही कारणाने वगळले जाणार नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी निवडणूक प्रशासनासमोर आहे. त्यामुळे मतदार कपातीच्या या मोठ्या आकडेवारीची प्रशासनाकडून सखोल छाननी होणार का आणि ६८ हजार ४४४ मतदारांच्या नोंदींचे नेमके काय झाले, याकडे आता कामठीकरांचे लक्ष लागले आहे.





