हंसराज,भंडारा :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मातोश्री पांदण रस्ता’ खडीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय अनियमितता आणि आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) व महाराष्ट्र राज्य किसान सभेने केला आहे. या संदर्भात जिल्हा कौन्सिलच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत संबंधित कामांची सर्व देयके तातडीने स्थगित करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मोहाडी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भागांत सुरू असलेल्या पांदण रस्त्यांच्या कामात मनरेगाच्या मूळ तत्त्वांनाच हरताळ फासण्यात आला आहे. कायद्यानुसार ही कामे अकुशल मजुरांच्या हाताने होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात कंत्राटदारांकडून सर्रासपणे जड यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. मजुरांच्या हक्काच्या रोजगारावर डल्ला मारला जात असून, कागदोपत्री मात्र जॉब कार्डधारकांची बोगस उपस्थिती दर्शवून शासकीय निधीचा अपहार केला जात असल्याचा गंभीर आरोप भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके व अन्य पदाधिकाऱ्यांनी केला आहे. रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून, अनेक ठिकाणी केवळ नावापुरते खडीकरण करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात आला आहे.
या गंभीर गैरप्रकाराची दखल घेऊन जिल्ह्यातील सर्व पांदण रस्ता कामांची मंजूर आराखड्यानुसार स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जोपर्यंत गुणवत्ता चाचणी आणि चौकशीचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करू नयेत. तसेच या भ्रष्टाचारात सामील असलेले दोषी अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे. या निवेदनासोबत यापूर्वीच्या तक्रारी आणि माहितीच्या अधिकारात मिळालेल्या पुराव्यांच्या प्रतीही प्रशासनाला जोडण्यात आल्या आहेत.
हे निवेदन सादर करताना महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य माधवराव बांते, राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव हिवराज उके, गजानन पाचे, जयप्रकाश मसरके, माणिकराव कुकडकर, रवी बावणे, दिलीप चोपकर, आफताब कुरेशी यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आता या तक्रारीवर जिल्हा प्रशासन काय पावले उचलते,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





