spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विजेचा धक्का लागल्याने जखमी मोर मोबाईल दुकानात शिरला; वनविभागाच्या सतर्कतेने मोराला मिळाले जीवदान

हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या बस स्थानक परिसरात आज सकाळी एका जखमी मोराच्या दर्शनाने नागरिकांची मोठी झुंबड उडाली. उडताना विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने जखमी झालेला हा मोर जीव वाचवण्यासाठी एका मोबाईल दुकानात शिरला, ज्यामुळे परिसरात काही काळ चिंतेचे आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने अत्यंत तत्परतेने धाव घेत या मोराला रेस्क्यू करून त्यावर उपचार केले आणि सुरक्षितरीत्या पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.

३१ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तुमसर बस स्थानक परिसरात एक मोर एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर झेप घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दुर्दैवाने उडत असताना त्याचा स्पर्श विजेच्या जिवंत विद्युत वाहिनीला झाला. विजेचा जोरदार धक्का लागल्याने मोर जखमी झाला आणि प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत त्याने जवळच असलेल्या परिणय भक्ते यांच्या मोबाईल शॉपमध्ये धाव घेऊन आश्रय घेतला. शहरातील गजबजलेल्या भागात राष्ट्रीय पक्षी मोराचे अशा प्रकारे दर्शन झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच या जखमी मोराला पाहण्यासाठी नागरिकांनी दुकानाबाहेर मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी छ. ग. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या आर. आर. टी. (RRT) चमुने तातडीने घटनास्थळ गाठले. वनविभागाच्या सदस्यांनी अतिशय कौशल्याने मोराला ताब्यात घेऊन त्याच्यावर आवश्यक ते औषधोपचार केले. सुदैवाने मोराची जखम गंभीर नसल्याचे स्पष्ट होताच, त्याला पुन्हा सुरक्षितरीत्या निसर्गाच्या अधिवासात सोडून देण्यात आले. वनविभागाने दाखवलेली ही तत्परता आणि जखमी पक्षाला दिलेले जीवदान यामुळे वन्यप्रेमींसह नागरिकांनी प्रशासनाचे मनापासून कौतुक केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.