संदीप कांबळे, कामठी :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असतानाही कामठी शहर व तालुक्यातील विविध सार्वजनिक ठिकाणी राजकीय स्वरूपाचे फलक व बॅनर झळकत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः काही फलकांवर नगरपरिषदेच्या परवानगीशी संबंधित आवश्यक लोगो, परवानगी क्रमांक अथवा पडताळणीसाठी संकेतचिन्ह दिसून येत नसल्याने या फलकांना अधिकृत परवानगी आहे की नाही, याची प्रशासनाने तातडीने पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करणे ही संबंधित प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी राजकीय प्रसिद्धी करणारे फलक, बॅनर अथवा अन्य साहित्य आढळल्यास त्याची नोंद घेऊन त्यामागील परवानगी प्रक्रिया तपासणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील काही भागांत असे फलक अद्याप कायम असल्याने प्रशासनाच्या देखरेख यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
कामठी नगरपरिषद हद्दीत फलक व जाहिराती लावण्यासाठी निर्धारित प्रक्रिया व परवानगीची आवश्यकता असते. संबंधित फलकावर परवानगीचा तपशील किंवा पडताळणीसाठी उपलब्ध असलेले संकेतचिन्ह असल्यास त्याद्वारे अधिकृतता तपासता येणे अपेक्षित आहे. मात्र, काही फलकांवर असा तपशील स्पष्टपणे आढळत नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे संबंधित फलकांना नगरपरिषदेची परवानगी देण्यात आली आहे का? परवानगी असल्यास तिचा क्रमांक व आवश्यक तपशील फलकावर का दर्शविण्यात आलेला नाही? आणि परवानगी नसल्यास अद्याप संबंधित फलकांवर कारवाई का झालेली नाही? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
कामठी नगरपरिषदेने शहरातील सर्व प्रमुख चौक, बाजारपेठा, मुख्य रस्ते व सार्वजनिक ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. या तपासणीदरम्यान प्रत्येक फलकाचा परवानगी क्रमांक, नगरपरिषदेची मान्यता, आवश्यक संकेतचिन्ह, फलक लावण्याची मुदत आणि संबंधित व्यक्ती अथवा संस्थेची माहिती यांची पडताळणी करण्यात यावी.
नियमांचे उल्लंघन आढळल्यास केवळ फलक हटविण्यापुरती कारवाई न करता संबंधित फलक कोणी लावला, परवानगी घेतली होती का आणि नियमभंग झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, याचीही चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.निवडणूक आचारसंहिता ही सर्व संबंधितांसाठी समान असते. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाशी, पदाधिकाऱ्याशी किंवा इतर घटकाशी संबंधित फलक असो, त्याची तपासणी समान निकषांवर होणे आवश्यक आहे. प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता नियमांची कठोर आणि समान पद्धतीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, कामठी शहरातील बऱ्याच ठिकाणी राजकीय पदाधिकारी व नेत्यांचे फलक तसेच विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजनाचे फलक अद्यापही दिसून येत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही हे फलक सार्वजनिक ठिकाणी कायम असल्याने संबंधित यंत्रणेकडून याची दखल घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक ठिकाणी झळकणाऱ्या फलकांवर प्रशासनाची प्रभावी नजर असणे आवश्यक आहे. नियमांचे आवश्यक तपशील नसलेले फलक आढळून येत असताना प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, नगरपरिषद हद्दीतील फलकांची तपासणी कधी केली जाते आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता कामठीकरांचे लक्ष लागले आहे.








