यासीन शेख, गोंदिया :- अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात न्याय, समानता व सामाजिक ऐक्याच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात भव्य जनजागृती आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (जयस्तंभ चौक जवळ), गोंदिया येथे होणार आहे.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती उपवर्गीकरण जागर समिती, गोंदिया जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार असून, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या माध्यमातून उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येणार असून, संविधानिक हक्कांचे रक्षण, सामाजिक एकता आणि न्याय मिळवण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. “संविधान वाचवा, हक्क वाचवा” या घोषणेसह एकजुटीच्या बळावर आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
यावेळी उपवर्गीकरण संदर्भातील काही प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये राज्य सरकारने स्थापन केलेल्या बडर समितीचा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, समाजातील सर्व घटकांशी संवाद साधावा, तसेच २०२७ मधील जातीय जनगणना पूर्ण करून त्यावर आधारित निर्णय घ्यावेत, अशा मागण्या आहेत. तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या मूळ टक्केवारीत कोणतीही कपात करू नये, अशी ठाम भूमिका मांडली जाणार आहे.
या आंदोलनासाठी आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले असून, हक्कांसाठी लढा देत न्याय मिळवण्याचा संदेश दिला आहे.

