spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

– कांद्री चेक पोस्टवर वजन काटे बंद झाल्यामुळे वाहनाच्या लांबलचक रांगा

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील कांद्री चेक पोस्ट येथे वजन काटे अचानक बंद पडल्याने दुपारी सुमारे ३ वाजल्यापासून महामार्गावर आणि चेक पोस्ट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. दोन्ही बाजूंनी ट्रक, मालवाहू वाहने आणि खासगी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. वजन काट्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहनांची तपासणी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे काही वेळातच वाहनांची संख्या वाढत गेली आणि वाहतूक संथ गतीने सुरू राहिली. या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकल्याचे हृदयद्रावक दृश्य दिसून आले. सायरन वाजवत असतानाही रुग्णवाहिकेला मार्ग मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त करण्यात आली. अनेक वाहनचालकांनी या वाहतूक कोंडीला कंटाळून ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा पर्याय निवडला. त्यामुळे गावांमधील रस्त्यांवरही अचानक वाहनांची वर्दळ वाढली. परिणामी स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ता दीपेश दरोडे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आरोप केला की, दुपारी ३ वाजतापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निर्माण झालेली वाहतूक कोंडी ही संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाली. वजन काट्यांची वेळेवर देखभाल न करणे आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध न ठेवणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण घटनेत आरटीओ प्रशासन व चेक पोस्ट व्यवस्थापनाची निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून आल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये होती. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.