spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शेगावच्या धर्तीवर केळापूर जगदंबा संस्थानचा २५ कोटींचा मास्टर प्लॅन

– भाविकांच्या सेवेसाठी कटीबद्ध: आमदार राजु तोडसाम यांचा संकल्प

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- जगदंबा संस्थान केळापूर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भाविकांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर तब्बल २५ कोटी रुपयांचा विशेष विकास आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी श्री जगदंबा देवस्थानच्या कार्यक्रमात बोलतांना ही घोषणा केली असून, यापूर्वी मंजूर झालेल्या ५ कोटींच्या निधीतून तात्काळ कामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. केळापूर जगदंबा संस्थान परीसरात आयोजित विशेष नागरी सत्कार व बैठकीप्रसंगी आमदार तोडसाम यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यापूर्वी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता, तर पाठोपाठ ३ कोटींचा अतिरिक्त निधीही मंजूर झाला होता. या निधीतून भाविकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. मात्र, केवळ प्राथमिक सुविधांवर न थांबता, भविष्यातील २५ वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

“मागणं फक्त आरोग्याचं; पद किंवा मंत्रीपद नको!”

“मी आमदार झाल्यापासून कधीही स्वतःसाठी काही मागितलेले नाही. ना मंत्रीपद मागितले, ना कोणती वैयक्तिक अपेक्षा ठेवली. ईश्वराकडे आणि जगदंबेच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो— सामान्य माणसाची व शेवटच्या घटकाची सेवा करण्यासाठी माझी तब्येत निरोगी व तंदुरुस्त ठेव! आपण प्रामाणिकपणे कर्म व सेवा केली, तर ईश्वर सर्वकाही देतो,” अशा शब्दांत आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शेगावच्या धर्तीवर २५ कोटींचा भव्य आराखडा

प्रयागराज किंवा कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या तसेच दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची सोय व्हावी, यासाठी आधुनिक स्वच्छतागृह, भक्तनिवास आणि परिसर सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव समोर आला होता. सुरुवातीला श्री जगदंबा संस्थानच्या विश्वस्त व भाविकांनी १.५ ते २ कोटींच्या कामाची विनंती केली होती. परंतु, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत “तुमची अपेक्षा लहान असली तरी माझी मानसिकता मोठी आहे,” असे सांगत थेट २५ कोटींच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव मांडला. शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर शिस्तबद्ध व भव्यदिव्य वास्तुकला (आर्किटेक्चरल डिझाइन) तयार करून केळापूर जगदंबा देवस्थान विकसित केले जाईल, असे आमदार तोडसाम यांनी स्पष्ट केले.

‘क्षमा हाच सर्वात मोठा धर्म’

भाषण दरम्यान आमदार तोडसाम यांनी सामाजिक सलोखा आणि नम्रतेचा संदेशही दिला. “कामाच्या किंवा संवादाच्या ओघात अजाणतेपणी कोणाचा अवमान झाला असेल किंवा काही चूक झाली असेल, तर मी जाहीरपणे माफी मागायला अजिबात संकोच करत नाही. या भूतलावर क्षमा हेच शांततेचे सर्वात मोठे शस्त्र आहे. ज्याच्या मनात क्षमाशीलता असते, त्याचे व्यक्तिमत्त्व महान ठरते,” असे भावूक उद्गार आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी काढले.

कार्यक्रमादरम्यान श्री जगदंबा देवस्थान विश्वस्त मंडळ व उपस्थित नागरिकांच्या वतीने आमदार प्रा. राजु तोडसाम यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे, उपाध्यक्ष काशिनाथ शिंदे, सचिव चंद्रकांत पाटील पोलाडीवार, कोषाध्यक्ष प्रेमराव वखरे, सदस्य वामन सिडाम, दिपक अण्णा कापर्तीवार यांच्यासह पत्रकार बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.