– भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची टीका
मुंबई :- महाविकास आघाडीचा 1 नोव्हेंबरचा मोर्चा हा सत्याचा नव्हे तर ‘असत्याचा मोर्चा’ आहे. संविधान वाचवा, लोकशाही जगवा अशी हाकाटी देत काढण्यात येणारा हा असत्याचा मोर्चा म्हणजे फॅशन शो आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने बिथरलेले महाविकास आघाडीचे नेते हे असत्य बोलून बिनबुडाच्या खोट्या आरोपांची राळ उठवून रान पेटवण्याचा फार्स करत आहेत अशी बोचरी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मविआच्या या असत्याला विधानसभा निवडणुकीत सूज्ञ मतदारांनी साफ नाकारले होते याचीही आठवण त्यांनी करून दिली.
फॅशन स्ट्रीटवरून निघणा-या या असत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी लोकलने न जाता मेट्रोने जावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने सुरू केलेल्या मेट्रोची सेवा प्रवाशांसाठी किती आरामदायी, किफायतशीर आहे याची प्रचिती घ्यावी असा खोचक सल्ला बन यांनी दिला. मेट्रोच्या सिद्धीविनायक स्थानक ते हुतात्मा चौक स्थानक असा एसी मेट्रोने राज यांनी हुतात्मा चौकात पोहोचावे तिथून हिंदू जिमखान्याला जाणे सोपे आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, वैभवाचे प्रतिक असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी, पर्यटकांच्या सोयीसाठी नमो पर्यटन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. छत्रपती शिवरायांचा गडकिल्ल्यांचा समृद्ध वारसा जतन करावा, त्यांना गतवैभव प्राप्त करून द्यावे हीच मागणी मागे राज यांनी केली होती ती मागणी आता नमो पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे असे बन म्हणाले. राज यांनी योग्य माहिती घ्यावी असे सांगत पर्यटन केंद्रे उभारली म्हणजे गडकिल्ल्यांचे नामकरण होणार असा चुकीचा अर्थ काढून गहजब केला जात असल्याचे बन म्हणाले. महायुती सरकारकडून पर्यटन वृद्धी आणि गडकिल्ले संवर्धनासाठी ही नमो पर्यटन केंद्रे उभारण्यात येणार असतील तर त्यात गैर काय असा सवालही बन यांनी केला.
रोहित पवारांनी अर्धवट ज्ञान पाजळले
रोहित पवारांनी कर्जमाफीबद्दल केलेल्या ट्वीटवरून रोहित यांचे याबाबतीत असलेले त्रोटक ज्ञान दिसून येते. महायुती सरकारने 34 जिल्ह्यांत कर्जवसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचा शासन आदेश काढला असताना रोहित अर्धवट माहितीआधारे केवळ फुटकळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सरकारवर धादांत खोटे आरोप करत आहेत अशी टीका बन यांनी केली. रोहित यांचे आजोबा शरद पवार केंद्रामध्ये कृषिमंत्री असताना शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या होत्या हे रोहित पवार सोयीस्करपणे विसरतात आणि त्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याआधी आपल्या आजोबांना त्यांनी प्रश्न विचारावेत असा खोचक सल्ला बन यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांना मिळणा-या प्रसिद्धीमुळे सुषमा अंधारे यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला आहे. प्रकाशझोतात राहण्यासाठीची सुषमा अंधारे यांची धडपड अधिक वाढली असून त्या खोटेनाटे आरोप करत असल्याची टीका बन यांनी केली. मविआ सरकार असताना झालेल्या पालघर साधू हत्याकांडाची आठवण करून देत अंधारे यांनी बडबड करू नये असा निशाणा साधला.
राज यांची बदलती भूमिका
राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल बोलताना बन म्हणाले की, राज ठाकरे सातत्याने वेगवेगळी भूमिका घेतात. 2014 ला त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला, 2019 ला त्यांनी मविआची साथ दिली, 2024 ला त्यांनी पुन्हा भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता शिंदे यांच्यावर टीका करणारे राज कदाचित महापालिका निवडणुका झाल्यानंतर शिंदे यांना पाठिंबाही देतील अशी पुस्ती बन यांनी जोडली .




