नागपूर :- नागपूर शहरात पर्यटकांचा ओघ वाढविण्यासह शहराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी आणि नागपूरचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने भव्य ‘मारबत महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येत आहे. महापौर निता ठाकरे यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराबत महोत्सवाचे आदरयुक्त निमंत्रण दिले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, नगरसेविका वर्षा चौधरी यांच्यासह आदी उपस्थित होते.
यापूर्वी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी देखील दिल्लीत मध्ये जाऊन विविध मान्यवरांना नागपूरच्या या ऐतिहासिक आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेला नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने महोत्सवाचे अधिकृत निमंत्रण दिले होते. विशेष म्हणजे, नागपूरची ऐतिहासिक संस्कृती जपणाऱ्या आणि १४५ वर्षांचे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या मारबत महोत्सवासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे.
महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांच्या देखरेखीत मारबत व बडग्या महोत्सवाची तयारी केल्या जात आहे. त्यातच एक भाग म्हणून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना महोत्सवासाठी निमंत्रित केले जात आहे. महोत्सवात नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग राहावा आणि शहराचे वैभव जगासमोर यावे, यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व्यक्तींना निमंत्रित केले जाणार आहे.





