नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेहरू नगर झोन क्र. ५ मधील वर्ष २०२५-२६ च्या कामांबाबत मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ येणारे कलम । (एक्स) प्रमाणे सभापती सीमा ढोमणे यांनी लक्षवेधी मांडली. यावेळी झोन क्र. ५ च्या सभापती सीमा ढोमणे यांनी नेहरू नगर झोन क्र. ५ च्या सहाय्यक आयुक्त यांच्यावर ₹४ कोटी ६४ लाख १३ हजारांचे देयके संदर्भात मोठा गैरकारभार आणी धांदलीचा लेखाजोखा सभागृहात प्रखरतेने मांडला. सहाय्यक आयुक्तांनी दाखवलेली कामे प्रभागात कुठेच दिसत नसुन न झालेल्या कामांचे देयके कंत्राटदारांना अदा करण्यात आले तसेच अनेक कामे वारंवार पुन्हा-पुन्हा दाखविण्यात आले आणी त्या कामांचे देयके काढण्यात आल्याच्या गंभीर आरोप नेहरू नगर झोन क्र. ५ च्या सभापती, सीमा ढोमणे यांनी सभागृहात केला. विषयाचे गांभीर्य बघता महापौर, नीता ठाकरे यांनी नेहरू नगर झोन क्र. ५ च्या सहाय्यक आयुक्त यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त विपीन ईटनकर यांना दिले. येत्या १५ दिवसात या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे मनपा आयुक्त विपीन ईटनकर यांनी सभापती सीमा ढोमणे यांना आश्वासन दिले.
वर्ष २०२५-२६ साठी झोन क्र. ५ चे सुमारे ₹४ कोटी ६४ लाख १३ हजारांचे देयक दायित्व प्रशासनाकडून दाखविण्यात आले आहे. या दायित्वाची कामनिहाय माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली असली तरी, संबंधित कामे प्रत्यक्षात झाली आहेत की नाहीत, याची स्थळ पाहणी करण्याची मागणी सभापती सीमा ढोमणे यांनी वारंवार केली होती.
मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणीसंदर्भात प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच डिसेंबर २०२५ मध्ये निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत झोन क्र. ५ अंतर्गत कोणकोणत्या कामांना कार्यादेश देण्यात आले, जानेवारी २०२६ मध्ये नवीन नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांच्या प्रभागातील कामांबाबत त्यांना माहिती देण्यात आली होती का आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये नवीन महापौरांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर झोनमध्ये किती कामांचे कार्यादेश देण्यात आले, याची दिनांकवार व कामनिहाय माहिती सभागृहासमोर ठेवण्याची मागणी करण्यात आली. सभापती सीमा ढोमणे यांनी प्रशासनाकडे कार्यादेश, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, मोजमाप पुस्तिका, काम पूर्णत्व प्रमाणपत्र, प्रत्यक्ष कामाची स्थिती तसेच संबंधित देयकांचे भुगतान यांची पडताळणी करण्याची मागणी केली.
“प्रशासनाने दिलेल्या यादीतील सर्व कामे नियमानुसार झाली असतील तर त्यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यास कोणतीही अडचण नसावी. त्यामुळे प्रत्येक कामाची संयुक्त स्थळ पाहणी करून वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडण्यात यावी,” अशी मागणी सीमा ढोमणे यांनी केली. या संपूर्ण प्रकरणात संबंधित सहाय्यक आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच कार्यादेशापासून देयक मंजुरीपर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्याची मागणीही करण्यात आली. महापौरांनी आज सभागृहात विभागीय चौकशीचे आदेश दिल्याने सभापती सीमा ढोमणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. झोन क्र. ५ मधील नागरिकांच्या हितासाठी आणि मनपाच्या निधीच्या पारदर्शक वापरासाठी पुढील काळातही प्रत्येक कामाची वस्तुनिष्ठ तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सभापती सीमा ढोमणे यांनी केली आहे.





