– नवीन कामठी पोलिसांची कारवाई; विविध कंपन्यांच्या दारूसह वाहन जप्त, ८९ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना टी पॉईंट चौकात विनापरवाना दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध नवीन कामठी पोलिसांनी कारवाई करीत विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्यांसह वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण ८९ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी अक्षय राजे गणराज (वय ३३, रा. सुखदेव कॉलनी, कांद्री, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर) याला ताब्यात घेत याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास कलमना टी-पॉइंट चौकात ही कारवाई करण्यात आली. आरोपी अक्षय राजे गणराज हा विनापरवाना दारूची विक्री व वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून रॉयल स्टॅग डिलक्स, आयकॉनिक व्हाइट, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट, सह्याद्री गोल्ड आणि इम्पिरियल ब्ल्यू या कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या कारवाईत दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले एमएच ४० डी.जे. ७४०२ क्रमांकाचे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध नवीन कामठी पोलीस ठाण्यात , कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून . पुढील तपास सुरू आहे.ही यशस्वी कारवाई डीसीपी रमेश धुमाळ, एसीपी अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक झगडे, नसीम आदींनी केली





