Home Latest News निवासी आश्रम शाळा, निवासी मदरसांमध्ये गोवर-रुबेला लसीकरण १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान 

निवासी आश्रम शाळा, निवासी मदरसांमध्ये गोवर-रुबेला लसीकरण १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान 

0
70

टास्क फोर्स समिती बैठक ; सहकार्यासाठी अतिरिक्त आयुक्तांचे आवाहन

नागपूर ता १३ : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गोवर-रुबेलाचा संसर्ग वाढत असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात १५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये गोवर-रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. नागपूर शहरात संभाव्य धोका टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे उपाययोजना करण्यात येत आहेत. बालकांमध्ये या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी विशेषतः निवासी आश्रम शाळा आणि निवासी मदरसांमध्ये लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. नागपूर शहर क्षेत्रात आश्रम शाळा नसल्यामुळे निवासी मदरसांमध्ये हे लसीकरण अभियान राबविले जाणार असून या अभियानाला मदरसांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या नियमित लसीकरणासंदर्भात शुक्रवारी (ता. १२) अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेत टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद,  साथरोग अधिकारी डॉ गोवर्धन नवखरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती मानकर, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, डॉ. शीतल वंदिले, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. अतीक खान, डॉ. अश्विनी निकम, रोटरी क्लब नागपूर उत्तर चे अध्यक्ष  विनय दर्डा यांच्यासह शहरातील मदरसांचे प्रतिनिधी व शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत प्रारंभी जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी गोवर-रुबेला आजाराची माहिती दिली. राज्यात बीड, नाशिक जिल्ह्यात या आजाराचा उद्रेक झाला व त्यात काही मृत्युच्या देखील घटना घडल्या. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये व संसर्ग वाढू नये या हेतूने लसीकरण अभियान महत्वाचे आहे. निवासी शाळांमधील बालकांमध्ये या आजाराचा धोका जास्त असल्यामुळे त्यांना प्रतिबंधात्मक लस देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहर क्षेत्रात निवासी आश्रम शाळा नाहीत परंतू शहरात २० पेक्षा अधिक निवासी मदरसे आहेत. या मदरसांमध्ये ८१९ विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्वांचे लसीकरण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी बैठकीमध्ये दिले. याशिवाय ग्रामीण भागातील निवासी आश्रम शाळांमध्ये देखील हे लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.

१५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या लसीकरण अभियानाकरिता विशेष वैद्यकीय चमू गठीत करण्यात येणार आहे. या चमूमध्ये परिसरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, आंगणवाडी सेविका, मदरसांचे शिक्षक यांचा समवेश असेल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.

यावेळी निवासी मदरसांचे प्रतिनिधी, शिक्षकांनी आपल्या शंका उपस्थित केल्या त्याचे निराकरण अतिरीक्त आयुक्तांनी केले. गोवर-रुबेला याआजारावर लसीकरणाद्वारे प्रतिबंध करणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक बालकाला लस देणे अत्यंत आवश्यक आहे. या अभियानात तज्ञ डॉक्टरांची चमू कार्यरत असणार आहे. त्यामुळे अभियानाची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना देऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी मनपाला सहकार्य करा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी मदरसांचे प्रतिनिधी व शिक्षकांना केले.