कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर २७ मार्चला मुंबईत बैठक

0
38

नागपूर :- स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांकडून कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या कथित मनमानी, वेतन थकबाकी तसेच इतर प्रलंबित प्रश्नांबाबत येत्या २७ मार्च रोजी मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. तांत्रिक ॲप्रेंटीस, कंत्राटी कामगार (कर्म.) असोसिएशनच्या पाठपुराव्यानंतर कामगार उपआयुक्त (ग्रा.वि.) मुंबई यांनी ही बैठक बोलावली आहे. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली असून २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता समिती सभागृह, चौथा मजला, कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, मुंबई येथे होणार आहे.संघटनेच्या निवेदनानुसार, स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांना ऑगस्ट २०२५ पासून महावितरणच्या राज्यातील ३२९ उपकेंद्रांवर कंत्राटी कामगार पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र, स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून ऑगस्ट २०२५ पासून तर क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड कडून डिसेंबर २०२५ पासून आजपर्यंत कंत्राटी कामगारांचे वेतन अदा करण्यात आले नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे शेकडो कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, वाशीम विभागातील कंत्राटी कामगार स्व.केशव वाकुडकर यांचा १ डिसेंबर २०२५ रोजी ड्युटीवर येत असताना अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नियमानुसार मिळणारी भरपाई व आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. तसेच वाशीम येथील स्व.रामभाऊ बोरकर यांच्या निधनानंतरही संबंधित लाभ देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. याशिवाय कंत्राटी कामगारांना पे-स्लिप दिली जात नसल्याची, काही एजन्सीकडून दरमहा १५०० ते २००० रुपये वेतनातून जबरदस्तीने परत घेतले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच ईएसआयसी मध्ये कमगारांच्या कुटुंबीयांची माहिती अद्ययावत नसल्याने वैद्यकीय लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. वाशीम, अकोला, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, भंडारा आणि गोंदिया आदी मंडळांमध्ये कंत्राटी कामगारांना सुरक्षा साहित्य (टी अँन्ड पी) उपलब्ध करून दिले जात नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आदी प्रश्नावर चर्चा होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदीप पाटील, शेख राहील, अतुल पाटील, धिरज घायवट, शंकर जरकड, अनिल चव्हाण, राम कुटे आदिनी केले आहे.