नागपूर :- आजच्या काळात अनेक ठिकाणी लोक कुठेही सहज कचरा टाकतात. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याची सवय अनेकांमध्ये अजूनही दिसून येत नाही. प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, इत्यादी प्रकारचा कचरा मोकळ्या जागेत, रस्त्यांवर आणि जंगलात फेकलेला असतो, ज्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. या कचऱ्यामुळे माती, पाणी आणि हवा प्रदूषित होते. वन्यप्राणी हा कचरा खातात किंवा त्यात अडकतात, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया अडते, ज्याचा परिणाम पर्यावरण संतुलनावर होतो.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, स्वच्छतेची सवय लावण्यासाठी तसेच “मी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाही” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून पोहोचवण्यासाठी जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्ताने “रन, वॉल्क, क्लीन – फॉरेस्ट प्लॉगिंग ड्राईव्ह” या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण-२०२५ अंतर्गत सेमिनरी हिल्स बाल उद्यान परिसरात रविवारी सकाळी वाईल्ड अजाईल फाऊंडेशन तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला असून या उपक्रमाला नागपूर प्लॉगर्स, डीजीएस कॅप्स आणि नागपूर महानगरपालिकेच्या पीआयु टीमचे सहकार्य लाभले.
रविवारी, १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६:३० ते ९:३० या वेळेत आयोजित या उपक्रमासाठी सेमिनरी हिल्स येथील बाल उद्यान प्रवेशद्वारासह सेमिनरी हिल्स जंगलाच्या विविध प्रवेश मार्गांवर स्टॉल्स उभारण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर सहभागींसाठी कचरा पिशव्या, हातमोजे, मास्क, सॅनिटायझर आणि इत्यादी आवश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली होती.
या प्लॉगिंग ड्राईव्हमध्ये सुमारे २५० स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेत पर्यावरणाबद्दलची जबाबदारी दाखवली. सहभागींचे गट करून विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, ज्यामुळे सेमिनरी हिल्स जंगलाचा संपूर्ण परिसर प्रभावीपणे स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमादरम्यान सुमारे ४७० किलो कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये १९० किलो प्लास्टिक कचरा तर २८० किलो इतर कचरा समाविष्ट होता. संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची एकूण संख्या पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने जाणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांची आणि जागरूकतेची साक्ष देणारा ठरला.
या उपक्रमाबाबत बोलताना वाईल्ड अजाईल फाऊंडेशनचे संस्थापक प्रफुल देशमुख यांनी सांगितले की, “हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून पर्यावरणाबद्दल जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न होता. आज विविध वयोगटातील लोकांनी एकत्र येऊन जंगल स्वच्छ ठेवण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी ठरला. अशा छोट्या- छोट्या प्रयत्नांमुळे भविष्यात निश्चितच मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, असा माझा विश्वास आहे.
तसेच, डीजी शर्मा यांच्या कॅप्स संस्थेतील सुमारे २० विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांचे निसर्गाशी नाते दृढ झाले, तसेच पर्यावरणाबद्दलची जबाबदारीही अधिक स्पष्ट झाली, असे कॅप्स संस्थेतील पवन सारडा आपला अनुभव व्यक्त करताना म्हणाले.
