· 183 खत विक्री केंद्रांना नोटीस
· 43 खते विक्री केंद्राचे परवाने
· निलंबित दोन विक्री केंद्रांवर गुन्हे दाखल
नागपूर :- विभागात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा व खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी विभागात कृषी विभागातर्फे धडक मोहीम राबविण्यात येत आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, याबाबत कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे.
विभागातील सहा जिल्ह्यांसाठी या खरीप हंगामामध्ये 19.53 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या हंगामासाठी शासनाकडून 7.100 लाख मॅट्रिक टन खत पुरवठा मंजूर झाला आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या खतांची तसेच बियाण्यांची कमतरता भासणार नाही.
183 खत विक्री केंद्रांना नोटीस
विभागात खतांचा तसेच कृषी निविष्ठांचा काळाबाजार साठेबाजी थांबवण्यासाठी कृषी विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली आहे, या मोहिमेअंतर्गत विभागात 183 खतविक्री केंद्रांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासोबत 43 खत विकी केंद्रांचे परवाने निलंबित केले असून दोन विक्री केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अनावश्यक खतांचा साठा तसेच साठेबाजी करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी दिली.
खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांनी गरजेपुरतीच खते व बियाणे खरेदी करावी कुठल्याही परिस्थितीत अतिरिक्त साठा करू नये तसेच खतांची नियोजन करत असताना केवळ युरिया व डीएपी खतावरच अवलंबून राहता इतर पर्यायी व संयुक्त खताचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे खत विक्रेत्या केंद्रांनी खतांची विक्री केवळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावी व विक्री करताना मशीनद्वारे विक्री करावी तसेच शिल्लक खत प्रत्यक्ष साठा त्याची नोंदवही ठेवावी असे आवाहन ही विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी केले आहे.




