कामठी, ता. ७ : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील बँकेजवळील पुलापाशी येरखेड्याकडे जाणारा रस्ता ११ जुलैपासून एक महिन्यासाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता मुदत संपत आली असताना देखील मेट्रो स्टेशनच्या पिल्लर पायलिंगचे काम अद्याप अपूर्णच असून, रस्ता ११ ऑगस्टपासून पूर्ववत सुरू होणार की नाही, यावर येरखेड्यातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि चर्चा सुरू आहे.
ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हानदरम्यान मेट्रो फेज-२ चे काम सध्या जोरात सुरू आहे. यामध्ये कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीवर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या बांधकामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून येरखेड्याला जाणारा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला होता. या मार्गावरील वाहतूक थांबवण्याची अधिसूचना वाहतूक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती.
रस्ता बंद झाल्यामुळे येरखेड्यातील नागरिकांना पर्यायी मार्गाने, म्हणजेच नवीन पोलीस स्टेशनच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रोजच्या रोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आता या तात्पुरत्या बंदीची मुदत संपण्यास केवळ चारच दिवस उरले आहेत, पण तरीही काम पूर्ण होण्याचे कोणतेही लक्षण दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.




