spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“मेट्रोलॅब डायग्नोस्टिक्स सेंटर लॅबची घातक चूक! चुकीचा ब्लड ग्रुप देत महिला रुग्णाच्या जीवाशी खेळ – लॅब तत्काळ शील करण्याची मागणी”.

 

 नागपूर ०२ : मेट्रोलॅब डायग्नोस्टिक्स सेंटरकडून महिलेचा चुकीचा रक्तगट सांगितल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या सजगतेमुळे मोठी दुर्घटना टळली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार 23 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 ते 9 दरम्यान मोहरे दांपत्य एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाले होते. ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर वाठोडा रिंग रोडवरील रिलायबल हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टर जिभकाटे यांनी महिलेच्या शरीरातील रक्तस्राव पाहून तात्काळ ब्लड चेकअप व रक्त चढवण्याची गरज असल्याचे सांगितले.

रात्रीच हॉस्पिटल प्रशासनाने मेट्रोलॅब डायग्नोस्टिक्स सेंटर (श्रीमान कॉम्प्लेक्स, लोकमत चौक, धंतोली) येथून रक्त तपासणीसाठी कर्मचारी बोलावले. पीडितेच्या पतीच्या म्हणण्यानुसार, त्या रात्रीच व्हॉट्सॲपवरून हॉस्पिटलला रक्त तपासणीचा रिपोर्ट पाठवण्यात आला होता. परंतु काही कारणास्तव 24 एप्रिल रोजी सकाळी 11:45 वाजता महिलेचा ऑरेंज सिटी हॉस्पिटल, खामला चौक येथे शिफ्ट करण्यात आला.

  ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उघड झाली खरी बाब  

रिलायबल हॉस्पिटल आणि मेट्रो लॅबच्या रक्त तपासणी आणि रक्तगट रिपोर्टनुसार महिलेला “B पॉझिटिव्ह” असल्याचे नमूद होते आणि त्यावरच रक्त चढवण्याची तयारी सुरू होती. मात्र ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये नियमानुसार पुन्हा तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली महिलेचा प्रत्यक्ष रक्तगट “O Rh पॉझिटिव्ह” असल्याचे स्पष्ट झाले. क्रॉस व्हेरिफिकेशननंतर हे लक्षात आले की मेट्रोलॅब डायग्नोस्टिक्स सेंटरकडून रक्तगटाचा दिलेला रिपोर्ट चुकीचा होता. वेळेवर ही चूक लक्षात आली नसती, तर चुकीचे रक्त चढवले गेले असते आणि महिलेच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता.

सजगतेमुळे वाचला जीव, मोठा अपघात टळला

ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर सावधगिरी बाळगल्यामुळे ही गंभीर चूक उघडकीस आली. पीडितेच्या नातेवाईकांनी या निष्काळजीपणाला “गंभीर गुन्हा” ठरवत मेट्रोलॅब डायग्नोस्टिक्स सेंटरच्या संचालक व संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  लॅब संचालकांवर गंभीर आरोप, डीसीपी राहुल मदने यांच्याशी नातं सांगून दबाव आणण्याचा प्रयत्न 

पीडितेचे पती, जे स्वतः पोलिस विभागात कार्यरत आहेत, त्यांनी आम्हाला ही माहिती दिल्यानंतर आम्ही आणि आमची टीम मेट्रोलॅब डायग्नोस्टिक्स सेंटरमध्ये या प्रकरणासंबंधी विचारपूस करण्यासाठी पोहोचलो. तेव्हा डॉ. नागसेन अशोक सखारे, भारती सरायकर आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते  सरायकर यांनी स्वतःला लॅबची संचालक असल्याचे सांगितले. जेव्हा त्यांना चुकीच्या रिपोर्टबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी हे प्रकरण “टेक्निकल एरर” असल्याचे सांगून टाळाटाळ केली.

यावेळी सरायकर यांनी अप्रत्यक्षपणे डीसीपी राहुल मदने हे त्यांचे नातेवाईक आहेत असे सांगत दबाव आणण्याचा प्रयत्न पीडितेच्या पतीवर केला. यावर पीडिताचे पती मोहरे यांनी विचारले, तुम्ही अधिकारीांचे नाव घेऊन मला घाबरवू इच्छिता का?, तेव्हा सरायकर यांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला.

लॅब संचालकांची बाजू 

 या प्रकरणी भारती सरायकर यांचे म्हणणे होते की, प्रत्येक रिपोर्ट काळजीपूर्वक तयार केला जातो. ही चूक कशी झाली, याची माहिती नाही. मात्र, पुढे आम्ही अधिक खबरदारी घेऊ.

नातेवाईकांची मागणी व्हावी कठोर कारवाई 

 या दरम्यान, नातेवाईकांनी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडे या प्रकरणी तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही केवळ तांत्रिक चूक नसून थेट जीवाशी खेळ आहे. उद्या एखाद्याला असाच चुकीचा रिपोर्ट देऊन रक्त चढवले गेले, तर त्याचा जीवही जाऊ शकतो. नागपूरसारख्या शहरात अशा निष्काळजी लॅब्सचा तीव्र निषेध करत अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. तसेच नातेवाईकांनी इशारा दिला आहे की, जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर लॅब आणि संबंधित प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.