चंद्रपूर ०३ – मनपा आरोग्य विभागामार्फत संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविण्यात येत असुन या अंतर्गत आरोग्य चमु शहरातल्या प्रत्येक घरांची तपासणी करणार असल्याने घरी येणाऱ्या ब्रिडींग चेकर्सना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाळा सुरु होताच डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार होण्यास सुरवात होते. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे,घरातील कूलर,टायर,कुंड्या खालील प्लेट,फ्रीज खालील ट्रे,पाण्याचे ड्रम, फिश टँक, एसीचे पाणी पडणारे कंटेनर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. नयना उत्तरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु व 170 आशा वर्कर तसेच स्वच्छता निरीक्षक यांच्याद्वारे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची स्व- तपासणी करणे देखील आवश्यक आहे.प्रत्येकाने आपल्या घरातील पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा कोरडी करून,पुसून वाळवणे आवश्यक आहे जेणेकरून डास अंडी निर्माण होणार नाही. डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. डेंग्यु डासाची उत्पत्ती टाळणे आवश्यक असल्याने आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.
लक्षणे – डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत.ताप आल्यास वैद्यकीय सल्ला शिवाय कुठलीही औषधे घेऊ नये. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु सर्वसामान्यांना या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे याबाबत नागरिकांना वारंवार माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
बचाव कसा करावा – संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. प्रत्येक घरातील एका व्यक्तीने दररोज फक्त दहा मिनिटे पुढील दहा आठवडे घराची पाणी साचलेले सर्व कंटेनर यांची स्व तपासणी केल्यास निश्चितच डेंग्यू आजारापासून बचाव होऊ शकतो. आधी ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते ते व संभाव्य दुषित घरे यावर विशेष लक्ष ठेवले जात असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम ( कंटेनर सर्वे ) सुरु.


ब्रिडींग चेकर्स करणार घरांची तपासणी
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



