Home Latest News एमआयडीसी पोलिसांची प्रभावी कामगिरी; तीन गुन्हे उघडकीस, १.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमआयडीसी पोलिसांची प्रभावी कामगिरी; तीन गुन्हे उघडकीस, १.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
59

नागपूर, ८ : नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणून पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १ लाख ३८ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पोलिसांनी रोमंच रवींद्र रंगारी (वय २०, रा. दिघोरी) याला तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेला १५,००० रुपयांचा एलईडी टीव्ही आणि ३०,००० रुपयांची हिरो होंडा सीडी १०० डिलक्स (क्रमांक एमएच ३१ एयू ५६९२) अशी एकूण ४५,००० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शासनाने कोरडा दिवस घोषित केला होता. या काळात गस्त घालत असताना एमआयडीसी पोलिसांनी अमोल मोतीराम इंगोले (वय ३२, रा. भीमनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वेगवेगळ्या ब्रँडच्या ५९७ विदेशी आणि देशी दारूच्या बाटल्या आणि एक ॲक्टिव्हा गाडी (क्रमांक एमएच ४० बीयू १५९७) असा एकूण ९३,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्याचप्रमाणे, पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये तपास पथकाने तीन सराईत आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये हद्दपार आरोपी निलेश ऊर्फ क्लोमेक्स भीमराव मांडस्कर (वय २९, रा. वैशालीनगर) याचाही समावेश आहे. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने त्याला अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही यशस्वी कामगिरी परिमंडळ क्र. १ चे पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी आणि सहायक पोलीस आयुक्त सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन, सहायक पोलीस निरीक्षक संजय बनसोड आणि त्यांच्या पथकाने केली आहे.