Home Latest News घरफोडी करणाऱ्या नोकराला अटक, गुन्हे शाखेची पश्चिम बंगालमध्ये कारवाई

घरफोडी करणाऱ्या नोकराला अटक, गुन्हे शाखेची पश्चिम बंगालमध्ये कारवाई

0
65

नागपूर ८ : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीतांजली चौक, सारडा निकेतन येथील रहिवासी  रितू अजितकुमार सारडा यांच्या घरातून चोरी करणाऱ्या नोकराला नागपूर गुन्हे शाखेने पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. आरोपीकडून १७.७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारडा कुटुंबाला दिल्लीला जायचे असल्यामुळे त्यांनी बँकेच्या लॉकरमधून सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने काढून बेडरूममधील कपाटात ठेवले होते. ९ ते १० ऑगस्ट २०२५ दरम्यान, त्यांच्या कपाटातून हिऱ्याची अंगठी आणि सोन्याचे दागिने (३८७ ग्रॅम) तसेच १ लाख ७० हजार रुपये रोख, असा एकूण २१ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

या घटनेनंतर, गेल्या तीन महिन्यांपासून सारडा यांच्याकडे घरकाम करणारा नोकर राज चक्रवर्ती हा देखील गायब असल्याचे आढळले. त्याचा मोबाईल फोनही बंद होता. सारडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गणेशपेठ पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचा तपास करत असताना, गुन्हे शाखा, मालमत्ता विरोधी पथक आणि सायबर सेलने संयुक्तपणे तांत्रिक तपास सुरू केला. त्यावेळी आरोपीने दिलेले आधार कार्ड बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपास पुढे नेत त्याचे खरे नाव राजा मंड्डु चौधरी (वय ४५, रा. गारापोया, जि. नदिया, पश्चिम बंगाल) असल्याचे ओळखले.

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगना जिल्ह्यातील सोडपूर येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ११० ग्रॅम सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने, तीन मोबाईल फोन आणि ४,००० रुपये रोख असा एकूण १७,७७,४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला पुढील तपासणीसाठी गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलिस निरीक्षक भरत कन्हाडे, अनिल ताकसांडे, सहायक निरीक्षक नितीन चुलपार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.