spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुंबई अधिवेशनात आमदार राजकुमार बडोले यांचा HPV लसीकरण व कर्करोग प्रतिबंधाबाबत ठोस मुद्दा

यासीन शेख, गोंदिया :- महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी १८ ते ४० वयोगटातील महिलांमध्ये वाढत्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.

गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कर्करोगांपैकी एक असून, योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार टाळता येऊ शकतो. यासाठी HPV (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लस प्रभावी ठरते. बाजारात ही लस उपलब्ध असतानाही अनेक महिलांना तिचा लाभ मिळत नसल्याने ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये कर्करोगाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत, असे आमदार बडोले यांनी सभागृहात नमूद केले.

त्यांनी शासनाकडे मागणी केली की, HPV लस सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून आर्थिक अडचणीमुळे कोणतीही महिला या प्रतिबंधात्मक लसीपासून वंचित राहू नये. तसेच ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव असल्याने अनेक वेळा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात निदर्शनास येतो, तेव्हा उपचारासाठी उशीर झालेला असतो. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ‘कर्करोग स्क्रीनिंग अँड डिटेक्शन’ मोबाईल व्हॅन उपलब्ध करून नियमित तपासणी मोहीम राबविण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असून, वेळेत लसीकरण व तपासणी केल्यास गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असे ठाम मत आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. त्यांच्या या प्रश्नामुळे महिला आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधिवेशनाच्या केंद्रस्थानी आला असून, शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.