कामठी :- महाराष्ट्र स्टेट उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्ण महोत्सानाच्या निमित्ताने मुंबईतील डोम, एस. व्ही. पी. स्टेडियम येथे आयोजित तीन दिवसीय भव्य साहित्यिक व सांस्कृतिक सोहळा “बहार-ए-उर्दू” मध्ये कामठी येथील युवा साहित्यिक आणि मौलाना अबुल कलाम आझाद ज्युनियर कॉलेज, गांधी बाग येथील शिक्षक मोहम्मद आमिर आफाक यांना “न्यू टॅलेंट पुरस्कार 2022” ने गौरविण्यात आले.
हा सन्मान महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विकास व वक्फ विभागाचे कॅबिनेट मंत्री ॲड. मानिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी आणि अल्पसंख्याक आयोगाच्या आयुक्त प्रतिभा इंगळे मंचावर उपस्थित होत्या.
मोहम्मद आमिर आफाक हे एक कुशल शिक्षक असण्याबरोबरच सक्रिय आणि सर्जनशील साहित्यिक लेखक म्हणूनही ओळखले जातात. विद्यार्थी जीवनापासूनच त्यांचे लेख विविध वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये प्रकाशित होत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सेमिनारमध्ये संशोधनपर निबंध सादर केले आहेत, तसेच त्यांचे विचार आकाशवाणी नागपूरवरूनही वेळोवेळी प्रसारित होत असतात. ते साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रभावी सूत्रसंचालक म्हणूनही परिचित आहेत आणि अनेक साहित्यिक संस्थांमध्ये सक्रियरीत्या कार्यरत आहेत.
या यशाबद्दल नागपूर तसेच परिसरातील विविध संस्था, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.




