नागपूर :- मोरया फाउंडेशनच्या वतीने वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी विशेष ‘सखी उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम २७ जून रोजी लौंदे ज्वेलर्स, तिरंगा चौक नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कल्पना पराते व मनीषा उमरेडकर यांचे स्वागत करण्यात आले. मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका रजनी अविनाश चौहान यांनी वटसावित्री पौर्णिमेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व उपस्थित महिलांना सांगितले. तसेच महिलांमध्ये सांस्कृतिक जाणीव जागृत करणे, परंपरांचे जतन करणे आणि परस्पर स्नेहभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मोरया फाउंडेशन तर्फे दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

उत्सवात एक मिनिट गेम्स, म्युझिकल चेअर, उखाणा स्पर्धा तसेच नृत्य सादरीकरण अशा विविध मनोरंजक स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला पारंपरिक भारतीय पेहरावात सहभागी झाल्या होत्या. उत्स्फूर्त सहभाग, आनंदी वातावरण आणि सांस्कृतिक रंगत यामुळे ‘सखी उत्सव’ अविस्मरणीय ठरला.




