spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे निलंबन त्वरित मागे घ्या; भंडारा शहर काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

– सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही खपवून घेणार नाही; भंडारा शहर काँग्रेस अध्यक्ष धनराज साठवणे यांचा इशारा

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :-  लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईचा भंडारा शहर काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध केला आहे. हे निलंबन अन्यायकारक असून ते त्वरित मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.

३ फेब्रुवारी रोजी लोकसभेच्या कामकाजादरम्यान विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रक्रियेत राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने डॉ. प्रशांत पडोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून लोकप्रतिनिधींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याची भावना काँग्रेसने व्यक्त केली आहे.

यावेळी भंडारा शहर काँग्रेस अध्यक्ष धनराज साठवणे म्हणाले की, “डॉ. पडोळे जनतेच्या प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवत आहेत. अशा प्रकारे त्यांचे निलंबन करणे ही हुकूमशाही वृत्ती असून सत्ताधाऱ्यांना विरोध सहन होत नसल्याचे हे लक्षण आहे. लोकशाही वाचवण्यासाठी हा लढा सुरूच राहील.”

निवेदन सादर करतेवेळी धनराज साठवणे यांच्यासह अभिजीत वंजारी, शंकर तेलमासरे, गजानन बादशाह, शेख नवाब पटेल, किशोर राऊत, प्रमोद मानापुरे, लखणलाल चौरे, भगवान राऊत, जयश्री मेश्राम, नरेशचंद्र कावळे, पवन वंजारी, उमेश मोहतुरे, गिरीश रहांगडाले, मार्तंड बडोले, जीवन भजनकर, विनीत देशपांडे, अमित हूमने, रतन मेश्राम व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. “लोकशाही वाचवा”, “विरोधकांचा आवाज दाबू नका” अशा घोषणांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

Popular Articles