spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नाकाडोंगरीतील कुख्यात हातभट्टीवाला विशाल गौपालेवर ‘एमपीडीए’; भंडारा कारागृहात रवानगी

– जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्थानबद्धतेचे आदेश; चालू वर्षातील सातवी कारवाई

  – अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिसांचा कडक कारवाईचा बडगा

हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील कुख्यात हातभट्टी दारू विक्रेता विशाल राजेश गौपाले (वय २१) याच्यावर ‘एम.पी.डी.ए.’ (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा व हातभट्टीवाल्यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणारा कायदा) कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्याची भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून, चालू वर्षातील एमपीडीए कायद्यांतर्गत झालेली ही सातवी कारवाई ठरली आहे.

विशाल गौपाले हा गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाकाडोंगरी परिसराचा रहिवासी असून, तो मागील तीन वर्षांपासून मोहफुलाची अवैध हातभट्टी दारू गाळणे व तिची विक्री करण्याच्या गुन्हेगारी व्यवसायात सक्रिय होता. त्याच्यावर गोबरवाही पोलीस ठाण्यात हातभट्टी दारू निर्मिती व विक्री संदर्भातील अनेक गुन्हे दाखल आहेत. अवैध दारूविक्रीतून मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर साक्षीदारांना आमिष दाखवून तो न्यायालयामधून स्वतःची सुटका करून घेत होता.

त्याच्या या अवैध कृत्यांमुळे नाकाडोंगरी व परिसरातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळले होते. त्यामुळे गावात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला होता तसेच नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. अशा समाजकंटकावर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल गौपालेविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून सादर करण्यात आला. त्यावर भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी २ नोव्हेंबर रोजी त्यास जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, गोबरवाहीचे ठाणेदार अभिजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई कोमल ईश्वरकर आणि गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नेपाल गभने यांनी केली.

Popular Articles