spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपा निवडणूक: अनेक प्रभागांत रंगतदार लढत; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, शहरांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असली, तरी उद्धव सेना, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमुळे अनेक ठिकाणी ‘त्रिकोणी’ आणि ‘चौरंगी’ लढतींचे चित्र निर्माण झाले आहे.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या मोठ्या संख्येमुळे मोठ्या नेत्यांची डोकेदुखी वाढली असून, त्यांची खरी ‘अग्निपरीक्षा’ या निवडणुकीत होणार आहे.

प्रमुख प्रभागांतील स्थिती:

प्रभाग १ व २: येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. मात्र, उद्धव सेना-वंचित आघाडीने या लढतीत रंगत आणली आहे. जुन्या जाणत्या नेत्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.

बंगाली कॅम्प (प्रभाग ४): येथे २१ अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकल्याने मुख्य पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.भाजप मधून तिकीट न मिळाल्याने अजय सरकार यांनी अपक्ष उमेदवाराचा बिल्ला हातात घेत या निवडणुकीत आपली विद्रोही लाट निर्माण केली आहे.

जटपुरा (प्रभाग ७): राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) प्रवेशामुळे येथे तिरंगी लढत होत असून, उद्धव सेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या पत्नी रिंगणात असल्याने ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे.

नगीनाबाग (प्रभाग ९): येथे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक आणि काँग्रेसचे आमदार सुधाकर अडबाले यांचे समर्थक यांच्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.

महाकाली (प्रभाग १२): शहरातील पहिल्या महिला महापौर संगीता अमृतकर आणि माजी महापौर यांच्यातील संघर्षामुळे या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

विठ्ठल मंदिर (प्रभाग १५): येथे माजी आमदार आणि खासदारांच्या समर्थकांमध्ये अटीतटीची लढत होत आहे.

बंडखोरी आणि अपक्षांचा फटका

अनेक प्रभागांमध्ये पक्षांतर्गत बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. अधिकृत उमेदवारांविरुद्ध स्वकियानीच अपक्ष म्हणून दंड थोपटल्याने मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः बाबू पेठ, पठाणपुरा आणि लालपेठ या भागांत अपक्ष उमेदवारांनी मुख्य पक्षांच्या नाकीनऊ आणले आहेत.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी जोर लावला आहे, तर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. या निकालांवरून भविष्यातील विधानसभेची गणिते अवलंबून असल्याने प्रत्येक प्रभागातील विजयासाठी नेते सर्वस्वपणाला लावत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.