शहर विद्रूप करणाऱ्यांवर मागील सहा महिन्यात १८५ जणांवर कारवाई
नागपूर, ता. २६ : सार्वजनिक ठिकाणी, खासगी जागांवर, विद्युत खांब किंवा झाडांवर विनापरवानगी जाहिरातीचे फलक लावून शहर विद्रूप करणाऱ्याच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेने कारवाई केली असून, गेल्या सहा महिन्यात १८५ जणांवर दंड ठोठावला आहे.
महानगरपालिकेने आऊटडोअर जाहिरात धोरण २००१ तयार केले आहे. या धोरणात शहरात जाहिरात फलक लावण्याचे नियम, अटी व शर्ती नमूद केलेल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन करणा विरोधात महानगरपालिका कारवाई करते. जाहिरात फलक लावण्यासाठी महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने काही जागा निश्चित केलेल्या आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागातर्फे रितसर परवानगी घेणे अनिवार्य आहे.
या जागांवर रितसर परवानगी घेऊन जाहिरातीचे फलक लावता येतात. या नियमांचे उल्लंघन करून काही जण कोणत्याही परवानगीची पूर्तता न करता जाहिरातीचे फलक, बॅनर व होर्डींग लावतात. सार्वजनिक ठिकाणी, विद्युत खांब, वृक्ष, संरक्षक भिंती, पूल इत्यादी ठिकाणी विनापरवानगी जाहिरात फलक लावले जातात.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येते. गेल्या १ जानेवारी २०२५ ते ३० जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये १८५ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या सर्वांकडून ९ लाख २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाई अंतर्गत धरमपेठ झोनमध्ये सर्वाधिक ५१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आऊटडोअर जाहिरात धोरणांचे उल्लंघन करणाऱ्याकडून ३ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. हनुमाननगर झोनमध्ये २८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नेहरूनगर झोनमध्ये अनधिकृतपणे लावलेल्या जाहिरात फलक लावून २५ जणांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर ७३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गेल्या सहा महिन्यात आऊटडोअर जाहिरात धोरणांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात महानगरपालिकेने केलेली झोननिहाय कारवाई कंसात वसूल केलेला दंड रुपयांमध्ये.
१. लक्ष्मीनगर – १३ (५० हजार)
२. धरमपेठ – ५१ (३ लाख ४१ हजार)
३. हनुमाननगर – २८ (१ लाख ९ हजार)
४. धंतोली – २० (१ लाख
५. नेहरूनगर – २५ (७३ हजार)
६. गांधीबाग – १९ (९५ हजार)
७. सतरंजीपुरा – ५ (२५ हजार)
८. लकडगंज ः २ (९ हजार)
९. आशीनगर – ७ (४० हजार)
१०. मंगळवारी – १५ (८५ हजार)




