spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मिहानमध्ये मनपा ई-बस चार्जिंग स्टेशन उभारणार

– परिवहन समितीच्या बैठकीत एमएडीसीकडून साडेतीन हेक्टर जमीन संपादनास मंजुरी

नागपूर :- मनपाच्या परिवहन विभागाच्या बसेसच्या पार्किंगसाठी तसेच इलेक्ट्रीक बसेस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मिहान क्षेत्रात महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाकडून (एमएडीसी) 3.54 हेक्टर जमीन संपादन करण्यास परिवहन समितीने आज (ता. 30) मंजुरी प्रदान केली.

मनपाच्या परिवहन समितीची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात समितीच्या सभापती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला परिवहन समितीचे सदस्या रुपाली ठाकूर, अर्चना पडोळे, प्रमिला मथरानी, मंगला मस्के,  शैलेश रामसुंदर पांडे, दिनेश यादव व शकील पटेल यांच्यासह परिवहन व्यवस्थापक डॉ. मेघना वासनकर, कार्यकारी अभियंता नरेश सिंगमजोडे उपस्थित होते.

परिवहन विभागातर्फे संचालित होणार्या शहर बस सेवेसाठी मिहानच्या सेझ क्षेत्राबाहेरील मौजा खापरी येथील पार्किंग व इलेक्ट्रीक बस चार्जिंग स्टेशनच्या वापरासाठी नागपूर महानगरपालिकेने एमएडीसीकडे 3.54 हेक्टर जमिनीची मागणी केली होती. या मागणीला एमएडीसीच्या संचालक मंडळाने तत्वतः सहमती दर्शविली आहे. ही जागा 66 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळणार असून यासाठी मनपाला 6 कोटी 10 लाख 65 हजार रुपयांची रक्कम अदा करावी लागणार आहे. ही रक्कम एमएडीसीकडे भरल्यानंतर भाडेपट्टा करारनामा होणार आहे. या खर्चाला परिवहन समितीच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली आहे. याठिकाणी परिवहन विभागातर्फे बसेससाठी पार्किंगची व्यवस्था तसेच इलेक्ट्रीक बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

वाठोडा डेपो तसेच खापरी डेपोमध्ये फिडर बे बांधकाम करण्यासाठी 1 कोटी 55 लाख 1 हजार 79 रुपयांच्या खर्चाला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वाठोडा डेपो येथे 33 केव्ही फिडर बे बांधकामाकरीता 80 लाख 7 हजार 962 त्याचप्रमाणे खापरी डेपोमध्ये फिडर बे बांधकामासाठी 74 लाख 93 हजार 117 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. या निधीतून डेपोअंतर्गत फिडर बे बांधकामासोबतच रस्ते, परिसरातील विकास कामे केली जाणार आहे. या खर्चाला मनपा आयुक्तांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

Popular Articles