– येत्या १ जानेवारी रोजी मतदार सेल्फी पॉईंटचे उद्घाटन
नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर तरुणाई यांच्यासह सर्व मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्याकरिता स्वीप अभियानांतर्गत महानगरपालिकेतर्फे शहरात १ ते १३ जानेवारीपर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात सेल्फी पॉईंट, मतदान अधिकार रथ, कॅम्पस कनेक्ट प्रोग्राम, वॉक विथ व्होटर, मतदार जागरुकता बाईक रॅली, मानवी साखळी व मकर संक्रांतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी बलून फेस्टीवलचे आयोजित करून मतदारांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे.
सेल्फी पॉईंट उपक्रमाचा शुभारंभ फुटाळा तलाव परिसर येथे 1 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. स्वीप प्रमुख तथा उपायुक्त (स.वि.वि) डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्या मार्गदर्शनात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारा सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते स्वीप उपक्रमाचा प्रारंभ तत्पुर्वी नाताळ सणाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी शहरातील ४० ठिकाणी सांताक्लॉजच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमाला भरभरून ठिकठिकाणी नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
मनपा सार्वत्रिक निवडणुकीत तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती वाढावी, आणि लोकशाही पर्वात सहभाग वाढावा याकरिता रेशीमबाग चौक (मध्य नागपूर), आंबेडकर उद्यान (पूर्व नागपूर), विवेकानंद स्मारक (दक्षिण-पश्चिम नागपूर), फुटाळा तलाव (पश्चिम नागपूर), झुलेलाल पार्क (उत्तर नागपूर), गांधीबाग उद्यान (मध्य नागपूर) येथे हे सेल्फी पॉईंट तयार करण्यात येत आहे. मतदारांनी या आकर्षक सेल्फी पॉईंटला भेट देऊन आपले फोटो काढावेत. आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर करताना नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलला @nmcngp टॅग करा असे आवाहनही मनपातर्फे करण्यात येत आहे.
मतदान अधिकार रथ
याचबरोबर स्वीप कार्यक्रमांतर्गत 5 जानेवारी रोजी मतदारामध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी मनपा मुख्यालयातून मतदान अधिकार रथ यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. ही रथ यात्रा मनपाच्या दहाही झोन मध्ये फिरणार आहे. शिवाय ज्या भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे त्या भागात मतदारांना मतदानाकरिता जनजागृत करणार आहे.
त्याशिवाय 7 जानेवारी रोजी शहरातील सर्व प्राचार्याची विद्यापीठाच्या सहकार्याने रेशीमबाग चौक येथील सुरेश भट सभागृहात बैठकआयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल. शहरातील सर्व महाविद्यालयात मतदानासाठी शपथ देणे व संवाद कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मतदानासाठी जागृत करण्यात येणार आहे.
वॉक विथ वोटर
येत्या 10 जानेवारी रोजी मनपाच्या सर्व झोनमध्ये ‘वॉक विथ वोटर इन लो वोटर एरीया’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 11 जानेवारी रोजी ‘मतदार जागरुक बाईक’ रॅली काढली जाईल. या बाई रॅलीची सुरुवात मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन येथून होईल. त्यानंतर ही बाईक रॅली छावणी- पागलखाना चौक-जुना काटोल नाका- जॅपनीस गार्डन- लॉ कॉलेज चौक- सावरकर चौक- मुंजे चौक- घाट चौक- जगनाडे चौक- टेलिफोन एक्सचेंज चौक- मेयो चौक मार्गे फिरून मनपा मुख्यालयात बाईक रॅलीचे समापन होईल.
येत्या 12 जानेवारी रोजी ‘लो वोटर एरीया’ मध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती मानवी साखळी कनेक्ट प्रोग्राम आयोजित केला जाईल. तर 13 जानेवारी रोजी मकर संक्रात सणाचे औचित्य साधून ‘बलुन फेस्टीव्हल’ आयोजित करून मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.




