– मनपाद्वारे मेहेंदीबाग पुलाच्या खालील परिसर अतिक्रमण मुक्त
नागपूर :- महापौर निता ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कठोर कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील अतिक्रमण व अवैध बांधकामाच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेने धडक कार्यवाही करीत शुक्रवारी (ता. २८) रोजी विविध आस्थापनांना नोटीस दिले. यात लकडगंज झोन अंतर्गत परिसरातील एका आस्थापनेवर नोटीस बजाविण्यात आली तर, सतरंजीपुरा झोनमध्ये अतिक्रमण करणाऱ्या अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यात आली.
महापौरांच्या निर्देशानुसार मनपाच्या संबंधित विभाग व झोन कार्यालयांमार्फत शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणांची व अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या संबंधितांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रेस्टोरेंट, दुकाने व ठेले या आस्थापना तसेच इतर स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.

लकडगंज झोन: लकडगंज झोन अंतर्गत शास्त्रीनगर परिसरांतील अवैध बांधकाम व अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. त्यानुसार येथील अतिक्रमण करणाऱ्या प्लॉट नं.३२३, द प्रिजम अपार्टमेंटच्या ७ व्या माळ्यावरील मे. श्री सोमरस रेस्टोरेंट बार आस्थापनेला संबंधित कार्यवाही करून नोटीस देण्यात आले आहे. यावेळी सहायक आयुक्त विजय थूल उपस्थित होते.
सतरंजीपुरा झोन : सतरंजीपुरा झोन अंतर्गत मेहेंदीबाग पुलाच्या खालील परिसरात काही नागरिकांनी अनधिकृतपणे कब्जा करून वास्तव्य केल्याचे व परिसरात काही अनधिकृत दुकानेही उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर कारवाई करत संबंधितांचे अनधिकृत साहित्य व दुकाने हटवून परिसर रिकामा केला. यामुळे मेहंदीबाग पूलाच्या खालील परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे.








