नागपूर, ता. ७ : केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा २०२५’ या अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० वाजता “तिरंगा मॅरेथॉन” आयोजन करण्यात आले आहे. नागपूरकरांनी अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित ‘एक दौड देशभक्तीसाठी’ उपक्रमात मोठ्या संख्येत सहभागी व्हा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठणकर यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ५ किलोमीटरच्या “तिरंगा मॅरेथॉन” चे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन मुख्यमंत्री निवास ‘रामगिरी पासून सुरु होईल. तर लेडीज क्लब चौक, जी.पी.ओ. चौक, आकाशवाणी चौक, विधान भवन चौक, महानगरपालिका प्रशासकीय इमारती, बिशप कॉटन शाळा होत, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान होत मेट्रो हाऊस, तिरपुडे महाविद्यालय, जापनीज गार्डन होत अनुराधा न्यायमूर्ती बंगला येथे पोहोचेल व येथेच मॅरेथॉनची सांगता होईल. मॅरेथॉन मध्ये सहभागी नागरिकांनी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. विशेष म्हणजे यात, मुला-मुली स्पर्धकांमध्ये प्रत्येतकी प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार, ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तर प्रथम १० स्पर्धकांना ‘पुम’चे शूज आणि ११ ते ३० स्पर्धकांना ट्रॅकसूट दिला जाणार आहे. तसेच प्रथम २ हजार स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट दिली जाणार आहे. याशिवाय नोंदणीकृत स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
अशी करा नोंदणी
नागपूर महानगरपालिकेच्या ‘एक दौड देशभक्तीसाठी’ “तिरंगा मॅरेथॉन” स्पर्धेत सहभागी होण्याकरिता https://www.nmcnagpur.gov.in/ या संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख १० ऑगस्ट आहे. तर ११ ऑगस्ट रोजी यशवंत स्टेडियम येथे दुपारी दोन ते पाच वाजे दरम्यान टी-शर्टचे वितरण केले जाईल. अधिकाधिक संख्येत नागरिकांनी/स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा आणि देशभक्तीची भावना अधिक वृद्धिगत करावी असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.







