– १०० दिवसांच्या विशेष कृती आराखड्यांतर्गत दुसरी मोठी धडक कारवाई; गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक परिसर मोकळा
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- नगरपरिषदेने हाती घेतलेल्या १०० दिवसांच्या विशेष कृती आराखड्याची शहरात कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज, १९ जानेवारी रोजी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत शहरातील मुख्य बाजारपेठेत ७० हून अधिक अतिक्रमणधारकांवर धडक कारवाई केली. यामुळे रस्ते मोकळे झाले असून रहदारीचा अडथळा दूर झाला आहे.
शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगरपरिषदेने विशेष मोहीम आखली आहे. यापूर्वी खात रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याचे वारंवार आवाहन केले होते. मात्र, प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांना आजच्या कारवाईचा दणका बसला.

आजची कारवाई शहरातील अत्यंत गजबजलेल्या गांधी चौक ते पोस्ट ऑफिस चौक, बस स्थानक आणि त्रिमूर्ती चौक या मार्गावर करण्यात आली. या मोहिमेत रस्त्यावर असलेले दुकानासमोरील बांबूचे कच्चे गाळे, टिनचे शेड आणि रस्त्यावर बांधलेले सिमेंटचे रपटे (Ramps) बुलडोझरच्या साहाय्याने तोडून टाकण्यात आले. ६० ते ७० अतिक्रमणधारकांचे अनधिकृत बांधकाम या मोहिमेत हटवण्यात आले.
शहरातील अतिक्रमणांविरुद्धची ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. “सार्वजनिक रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी. अन्यथा, पुन्हा कठोर दंडनीय कारवाई केली जाईल,” असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
सदर कारवाई मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पवन कनोजे, संकेत कोचे, मिथुन मेश्राम, सनी सोनेकर, पवन मोगरे, अंकुश हुमणे, आकाश मेश्राम, सागर रगडे, अरविंद गणवीर, चांताराम तिबोडे यांच्यासह ४ फायरमन आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात होता. या धडक कारवाईमुळे शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.




