नागपूर :- नागपूर विभाग मराठा महासंघाच्या वतीने स्वर्गीय शरदराव भोसले व स्वर्गीय सतीशजी गिरमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृह, सक्करदरा चौकात निःशुल्क उपवर वधू-वर परिचय मेळावा तसेच कमी शुल्कातील ‘माझा जोडीदार’ या माहिती पुस्तिकेचे विमोचन उत्साहात संपन्न झाले. शिक्षण, प्रशिक्षण, व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने विवाहयोग्य मुला-मुलींचे विवाह योग्य वयात होत नसल्याने निर्माण होणाऱ्या विविध सामाजिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विवाह जुळवून देण्याच्या प्रक्रियेत होणारी फसवणूक, मुला- मुलींमधील संभ्रम आणि पालकांमधील वाढती चिंता लक्षात घेऊन मराठा महासंघाने हा समाजोपयोगी उपक्रम राबविला. नागपूर विभाग मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या प्रमुख नेतृत्वात या मेळाव्याचे अध्यक्षस्थान महाराजा ऑफ ट्रस्ट व नागपूर संस्थापक भोसले राजघराण्याचे श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांनी भूषविले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते ‘माझा जोडीदार’ या ३४० विवाहयोग्य मुला-मुलींची माहिती असलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार, विराण डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर दिलीप चव्हाण तसेच नवनिर्वाचित नगरसेवक सचिन नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात महाराष्ट्रासह छत्तीसगड व मध्यप्रदेशातील अनेक विवाह योग्य युवक-युवती आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे १०२ उपवर मुला-मुलींनी व्यासपीठावर येऊन स्वतःचा सविस्तर परिचय करून दिला. स्टेजवर प्रत्यक्ष परिचय देणाऱ्या युवक- युवतींना ‘शौर्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनामागे आयोजक नरेंद्र मोहिते यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनासह महासंघातील पदाधिकाऱ्यांचे समर्पित योगदान असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. तीव्र उष्णतेच्या वातावरणातही हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. पालकांसाठी उत्कृष्ट आसनव्यवस्था, तत्पर नोंदणी कक्ष आणि भोजन व्यवस्था यासाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजन समितीत नरेंद्र मोहिते, विठ्ठल जावळकर, दिलीप सस्ते, अविनाश घोगले, संजय घारगे, देवेंद्र शिंदे, मोहन जाधव, दीपक बानगळे, सुशांत शिंदे, दीपक देशमुख, अमित सवडे, गुणवंत माने, महेश पवार, राजेंद्र चवळे, प्रविण माने, दिलीप निघडे, प्रविण सोमोसे, राजेंद्र सावंत, सुनील चोपडे (चंद्रपूर), महेंद्र तुपकर (गोंदिया), संजय मोहिते (भंडारा), अरुण जगताप, उमाकांत डुकरे (वर्धा) आदींचा समावेश होता. ‘माझा जोडीदार’ पुस्तिकेसाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या दानशूर समाजबांधवांचे तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आयोजन समितीने आभार मानले. संचालन ममता भोसले व नरेंद्र मोहिते यांनी केले. प्रास्ताविक नरेंद्र मोहिते यांनी तर आभार प्रदर्शन मोहन जाधव यांनी केले.








